Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल पंचायत समिती सभेत शिक्षण विभागाला धरले धारेवर

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल पंचायत समितीच्या मासिक सभेत शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारावरून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावल पंचायत समिती सदस्यांची अखेरची मासिक सभा सभापती पल्लवी पुरुजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावल तालुक्यातील बारावी परीक्षा केंद्रांना शिक्षण विभागाच्या भरारी पथकाचे कुठलेही आदेश नसताना परीक्षा केंद्रांना भेटी का दिल्यात ? आपली बीट सोडून दुसऱ्या बिट मध्ये शाळा तपासणीचा उद्देश काय ? आपल्याकडे गटसमन्वयकचा पदभार आहे. गटसमन्वयक यांनी सोमवार व शुक्रवार या दिवशी कार्यालयात हजर राहायचे असते आपण कार्यालयात हजर राहत नाहीत, याबाबत बीआरसी कर्मचारी व शिक्षण विभाग लिपिक यांना बोलावून विचारणा केली असता ते कार्यालयात येतच नाहीत असे सांगण्यात आले. भरारी पथकामध्ये आदेश नसताना केंद्रांना भेटी देणे चुकीचे असल्याचे सांगण्यात आले.  पंचायत समितीच्या शेवटच्या मासिक सभेत पंचायत समितीचे विरोधीगटनेते  शेखर पाटील व गटनेते दीपक पाटील यांनी शिक्षण विस्तार अधिकारी नईम शेख यांच्याशी विचारणा करीत विभागाअंतर्गत होत असलेल्या अनधिकृत कारभाराविषयी विषयी विचारणा करीत कानउघाडणी केली.

 

परवानगी नसतांना शाळेच्या केंद्रात भेट देण्याबाबत केंद्र शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या सदस्य यांच्याकडे तक्रार केली होती.  शिक्षण विभागाच्या वतीने केंद्र तपासणीचे अधिकार आदेश कुठल्याही प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी दिलेले नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. असे असतांना सुद्धा यावल तालुक्यात शिक्षण विभागाचा कोणता अधिकारी शाळा शाळांमध्ये फिरत आहे. असून तपासणीच्या नावाखाली केंद्र संचालकांना त्रास देऊन पिळवणूक करीत आहे. असे करण्यामागे त्या अधिकाऱ्यांचा काय उद्देश आहे असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे सभापतीपद हे यावल तालुक्याला मिळाले आहे. असे असतांना देखील शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी एवढे मुजोर कसे आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर यावल पंचायत समितीच्या शेवटच्या मासिक सभेत लोकप्रतिनिधी यांनी शिक्षण विभागाच्या अशा प्रकारच्या कारभारा विषयी प्रश्न उपस्थित केल्याने या बाबत जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी व गटशिक्षणाधिकारी काय कार्यवाही करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहणार आहे .

Exit mobile version