Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उद्यापासून श्री क्षेत्र कपिलेश्‍वर येथील यात्रोत्सव !

अमळनेर-गजानन पाटील | अमळनेर तालुक्याच्या पश्चिमेस असलेल्या खान्देशातील पर्यटन व तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेले नीम ता.अमळनेर जवळील कपिलेश्वर महादेव मंदिराचा उद्या ता.८ मार्चपासून महाशिवरात्री यात्रोत्सवास सुरुवात होत असून,पंधरा दिवस हा यात्रोत्सव सुरू असतो.

जळगाव व धुळे जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेले एकहजार वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेले श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर हे खान्देशातच नव्हे तर संपूर्ण भारतात अल्पवाधित सर्वत्र परिचयास आलेले आहे. या मंदिरावर राज्यातील काना कोपर्‍यातुन भाविकांची गर्दी होऊ लागल्याने परिसराला महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूला तापी , पांझरा आणि गुप्तगंगा असलेल्या त्रिवेणी संगमावर सुमारे एक हजार वर्षांपूर्वी ऋषी कपिल मुनींनी तपस्या करीत शिवलिंगाची स्थापना केली आहे. या मंदिराचे महत्व स्कंदपुराणातही सांगितले गेले असून याच ठिकाणी मंदिराचे मठाधिपती हंसांनंदजी महाराज यांनी सन २००५ साली अखिल भारतीय संत संमेलन भरविले होते.यावेळी भारतातुन संतमहंतांनी हजेरी लावल्याने कळमसरेसह परिसरातील भूमी पावन झाली आहे. आध्यत्म आणि सामाजिकता यातून परिसरात कायापालट झाला आहे.

या मंदिराला लागूनच अनिरुद्ध बापूंचा आश्रम असून या ठिकाणी दर शनिवारी व रविवारी मुंबई,पुणे ,नाशिकसह महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातुन भाविक येत असल्याने या निसर्गाच्या सानिध्यात भाविकांची मांदियाळी नजरेस पडत आहे. याच ठिकाणी मठाधिपती हंसांनंद महाराज यांनी लहान बालकांसाठी मठ व वेधशाळा सुरू केली असून शालेय शिक्षणाबरोबर त्यांना संस्कार व अध्यात्मचे न्यान दिले जात आहे.मंदिरावर वर्षभर मोठ मोठे पूजाविधी शांती तसेच धार्मिक, सामाजिक कार्यक्रम सुरू असतात.तर महाशिवरात्रीला मोठा यात्रोत्सव भरविला जातो.

मंदिरात तीन शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे.या जागृत देवस्थानच्या दर्शनासाठी वर्षभर भाविक येत असतात. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचे बांधकाम केले असून हे मंदिर गोल घुमटाकार कोरीव हेमाडपंथी जागृत स्वयंभू असे स्वरूपाचे आहे. सकाळ प्रहरातील सूर्योदयाची पहिली सूर्यकिरणे थेट मंदिरातील शिवलिंगावर पडतात.अशी या मंदिराची उत्कृष्ट कलेचा आविष्कार असलेली कलाकृती आहे.

दरम्यान यात्रोत्सवासाठी पाळणा,उपहारगृहे,संसार उपयोगी वस्तू, खेळण्याची दुकाने थाटली असून अमळनेर आगाराने भाविकांना जाण्यासाठी जादा एस. टी. बसेसची सोय केली असून मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस शितलकुमार नाईक व त्यांचे पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त राहणार असून मंदिरावर दाळ बट्टीचा नैवदय ,नवस फेडण्यासाठी भाविक दाखल झाले आहेत.

Exit mobile version