Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यशवंत जाधव यांची 100 कोटींची मनी लॉन्ड्रिंग – किरीट सोमय्या

मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी 100 कोटींची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय.

सोमय्या पुढे म्हणाले की, 1 रुपया शेअर कोलकात्यातील कंपनीला 500 रुपयाला विकला. या घोटाळ्यात आयएएस अधिकारीही लिप्त आहेत. यात 15 कोटींचा फुलप्रुफ घोटाळा प्रधान डिलर्स प्रा. लि. कंपनीने केलाय. 20 / 10 / 2012 रोजी कंपनी स्थापन झाली आणि 30 / 10 / 2012 रोजी 15 कोटींचा व्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. हे सर्व उदय शंकर महावरच्या मदतीने झालं. उदय शंकर महावर हा गांधी कुटुंबाच्या जवळचा व्यक्ती आहे, असंही सोमय्या यांनी सांगितलं.

2020 मध्ये काही लाखात ही कंपनी जाधव कुटुंबाच्या नावावर झाली. यात 100 कोटी रुपयांचा अपहार झालाय. घाटकोपर, हिंदमाता इथल्या नाले सफाईच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे मुख्यमंत्र्यांनी खाल्ले आणि त्यामुळे मुंबई पावसात बुडाली असा गंभीर आरोप करत सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवलाय. यात 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग झालं. उद्धव ठाकरे सोनिया गांधींकडे गेले, यामागे उदय शंकर महाराव हे सूत्रधार होते. तीन एजन्सींकडून या अपहाराची चौकशी व्हावी अशी अपेक्षा सोमय्या यांनी व्यक्त केलीय.

नील सोमय्या यांना जेलमध्ये टाकलं नाही म्हणून हेमंत नगराळे यांची बदली करण्यात आली, असा दावा सोमय्या यांनी केलाय. आम्हाला मातोश्रीहून माहिती येते. सात दिवसांत कारवाई केली नाही तर पाहा काय होणार, असं हेमंत नगराळे यांना सांगण्यात आलं होतं, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर केलाय.

Exit mobile version