Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जागतिक एड्स दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

AIDS

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभागामार्फत राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंण समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

एड्स नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करतांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात संपन्न झाली. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प., जळगाव डॉ. दिलीप पोटोळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, पोलीस विभागाचे श्री,राठोड, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर, कार्यक्रम सहाय्यक गिरीश गडे यांच्यासह आरोग्‍य विभागातील विविध डॉक्टर, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा सामान्य रूग्णालय तसेच राज्य शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधून या राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमात विविध विभागांचा सहभाग करवून घेण्याकरीता व एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तसेच एचआयव्ही, टीबी, एआरटी यांच्या झालेल्या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी घेतला.

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या समिती सभेत एड्स नियंत्रण व प्रतिबंधक अभियानाचे कार्य अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले. त्यात प्रामुख्याने 1 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 8.30 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयापासून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रभातफेरीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या होणार असून त्याप्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात पोस्टर प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस मुख्यालयात 2 डिसेंबर रोजी दुपारी 4.00 वाजता मार्गदर्शन व पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून त्यात एचआयव्हीबाबत मार्गदर्शन व एैच्छिक तपासणी करणे आणि आयईसी साहित्यांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच जळगाव रेल्वे स्थानक व बसस्थानक येथे सकाळी 10 वाजता पोस्टर प्रदर्शन, मार्गदर्शन व आयईसी साहित्य वितरीत करण्यात येणार आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने 5 ते 31 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यातील 60 महाविद्यालयात स्थापित असलेल्या रेडरिबिन क्लबद्वारे युवकांमध्ये पोस्टर प्रदर्शन, व्याख्यान, चित्रफित दाखवून जिल्ह्यातील 23 आयसीटीसी केंद्राद्वारे युवकांसाठी विविध कार्यक्रम राबविले जाणार आहे. त्याचबरोबर 10 ते 31 डिसेंबर या कालावधीत दिशा समाजप्रबोधन संस्था, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने चित्रकला, रांगोळी, घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

दिनांक 9 डिसेंबर रोजी दुपारी 4.00 वाजता संगीत सभागृह, भास्कर मार्केट जवळ, जळगाव येथे आणि 10 डिसेंबर रोजी जिल्हा उद्दोग केंद्र, भुसावळ येथे पोस्टर प्रदर्शन, लघुपट आणि व्याखानाचे तर दुपारी 2.00 वाजता गोदावरी संस्था, जळगाव येथेही पोस्टर पदर्शन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आधार संस्था, अमळनेर तर्फे 10 ते 14 डिसेंबर दरम्यान अमळनेर, पाचोरा, चोपडा तालुक्यांतील देह विक्रय करणाऱ्या भगिनीकरिता, भगिनी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहेत.

एमएसएम (पुरुष, पुरुषांमध्ये लैंगिक संबध) मेळाव्यांतर्गत गोदावरी फाऊंडेशन, लुंकड मार्केट, जळगाव येथे पोस्टर प्रदर्शन, व्याख्याने, लघुपट इत्यादि कार्यक्रमाचे आयोजन व 13 डिसेंबर रोजी डिआयसी केंद्र, भुसावळ येथे सायंकाळी 4.00 वाजता गोदावरी संस्था, जळगाव यांचेतर्फे आयोजित करण्यात येणार आहेत.

राष्ट्रविकास संस्था, जळगाव यांचेमार्फत 16 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता एमआयडीसी, जळगाव येथे पोस्टर प्रदर्शन, माहिती पत्रिका वाटप, लघुपट, व्याख्याने अश्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ट्रक चालक व वाहक तसेच निगडीत कर्मचारी यांच्या मेळाव्यांतर्गत 5 ते 20 डिसेबर दरम्यान ट्रान्सपोर्ट नगर व शहराच्या आत येणाऱ्या नाक्यावर पोस्टर प्रदर्शन, माहिती पत्रिका वाटप व व्याख्याने देवून उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागांमध्ये 100 गावांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर, विविध मंडळे यांचे माध्यमांद्वारे ग्रामीण जनतेमध्ये एचआयव्ही एड्स विषयी जनजागृतीपर कार्यक्रम लिंक वर्कर (क्षेत्रीय कार्यकर्ते) आधार संस्था, अमळनेर यांचेमार्फत करण्यात येणार आहे. तरी सर्व संबंधित यंत्रणेने या अभियानात स्वयंस्फुर्तीने आपला सहभाग नोंदवून जिल्हा एड्स, टीबी मुक्त करण्यास सहकार्य करावे. असे आवाहन डॉ. ढाकणे यांनी केले आहे.

Exit mobile version