Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव येथे हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांची कार्यशाळा

magesh dada

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील युवानेते मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे शहरात आज दि. 6 सप्टेंबर रोजी एकदंत सांस्कृतिक कला महोत्सवात प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, जावेद हबीब यावेळी म्हणाले की, माझे आजोबा, वडील हे दोघेही न्हावी होते. मला न्हाव्याचा मुलगा म्हणून संबोधले जायचे. हा व्यवसाय करणारे त्यांच्याबद्दल व त्यांच्या कुटुंबाबद्दल समाजामध्ये सन्मान नव्हता. तेव्हापासून ठरवले की, या व्यवसायाला सन्मान मिळवून द्यायचा. जागतिक प्रतिष्ठा मिळवून द्यायची. त्यामुळे मी केसांचा डॉक्टर झालो. माझी कैची हेच माझे सर्वस्व झाले. मी आजही शिकतोच आहे. चाळीसगावसारख्या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम होतो, याचा अर्थ समाज आता हेअर कटींगच्या व्यवसायात असणाऱ्या बांधवांना स्वीकारत आहे. या प्रयत्नाला मंगेश चव्हाण व त्यांच्या मित्र परिवाराची साथ लाभत आहे, असे प्रतिपादन सिताराम पहेलवान मळा येथील सुरू असलेल्या मंगेश चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने आयोजित एकदंत सांस्कृतिक कला महोत्सवात प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांनी केले.

प्रशिक्षण कार्यशाळेत जावेद हबीब यांनी त्यांच्या बिनधास्त स्टाईलने दिवसभर ही कार्यशाळा घेतली. दाढी कशा पद्धतीने करायची, कशापद्धतीने कापायची, माणसांचे केस व स्त्रियांचे केस यांना कशा पद्धतीने कापायचे, हेअर कटचे वेगवेगळे प्रकार, पार्लरच्या वेगवेगळ्या पद्धती त्यांनी स्वतः करून दाखवल्या. जावेद हबीब यांचे देशभरात 900 सलून असून त्यात दहा हजार लोक प्रत्यक्ष काम करतात. प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित हेअर कटिंग सलूनमध्ये काम करणारे कामगार, मालक, पार्लर चालवणाऱ्या महिला तसेच या विषयाची आवड असणा-या नागरिकांनी प्रचंड गर्दी या कार्यशाळेत केली होती. या कार्यशाळेतून खूप काही शिकुन चालल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

संत सेना महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत जावेद हबीब याच्यासह मान्यवरांचा सत्काराने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. एकदंत कला महोत्सवाचे संयोजक युवानेते मंगेश चव्हाण यांनी प्रास्ताविक पर मनोगतात सांगितले की, “संत सेना महाराज यांच्या जयंतीनिमित्त आश्वासित केल्याप्रमाणे, जावेद हबीब यांना या एक दिवसीय कार्यशाळेसाठी बोलावले. पूर्वी गावामध्ये न्हावी हा संपूर्ण गावाचे नेटवर्क असायचा. एकूण वर्षाची एकदम पट्टी या समाजाला दिली जायची. पण काळ बदलला. प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांनी या व्यवसायाला जागतिक स्तरावर नेऊन ठेवले. न्हावी समाजासाठी काय देता येईल, याचा विचार करतांना फक्त किट देऊन तात्पुरत्या एका महिन्याची व्यवस्था लावण्यापेक्षा त्यांना कौशल्य देऊन आयुष्यभराची व्यवस्था लावण्याचा विचार त्यांनी केला. त्यातूनच ही प्रशिक्षण कार्यशाळा उभी राहिली. आज असे जाणवत आहे की, एका दिवसाच्या कार्यशाळेने खूप कमी साध्य होईल. मात्र निवडणुकीनंतर सात ते आठ दिवसांसाठी जावेद हबीब यांची कार्यशाळाचे आयोजन केले जाईल.

माझ्या नाभिक समाजातील बंधू आणि बघिणींना तसेच इतर ब्युटीशियन्स च्या ज्ञानामध्ये अधिकाधिक भर पडत जावी, यासाठी प्रयत्न करणार असून यासाठी तुमच्या मागे फक्त उभाच राहणार नाही, तर तुम्हाला स्वबळावर उभे राहण्यासाठी पुर्ण प्रयत्न करणार असल्याचे मंगेश चव्हाण यावेळी म्हणाले. नाभिक समाजाला सन्मान देण्याच्या या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा असतील व जेव्हा ही असा उपक्रम हाती घ्याल, तेव्हा नाभिक समाज संघटनेच्या वतीने आम्ही कायम तुमच्यासोबत असु, असे प्रतिपादन नाभिक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष नाना शिरसाठ यांनी व्यक्त केले. तसेच अभय वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळेस चाळीसगाव नाभिक समाजाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास जिवाजी महाला युवामंच कार्यकर्ते यांचे विशेष सहकार्य लाभले.

Exit mobile version