Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलांनी ताजे व पौष्टीक आहारांचे सेवन करावे-आ. सावकारे

aa.savkare

भुसावळ, प्रतिनिधी | बर्‍याच महिला घरातील काही दिवसांचे शिळे अन्न खातात, त्यामुळे त्यांना विविध आजार होतात. महिलांनी ताज्या व पौष्टीक आहाराचे सेवन करावे, असे प्रतिपादन आ.संजय सावकारे यांनी आज (दि.१६) येथे केले. ते खडका रोड भागातील कुरेशी हॉलमध्ये राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतर्फे आयोजित जनजागृतीपर कार्यक्रमात बोलत होते.

 

यावेळी आ. सावकारे पुढे म्हणाले की, गर्भवती महिलांनी पोषण आहाराबाबत सर्वाधिक काळजी घ्यायला हवी. कमी असले तरी पौष्टीक व ताज्या आहाराचेच सेवन करावे. अल्पसंख्याक समाज साक्षरतेत खुप पिछाडीवर असून त्यांच्यात शिक्षणाबाबत जनजागृतीची गरज आहे. मुस्लिम महिला आपल्या विविध आजारांवर उपचारासाठी पुरूष डॉक्टरांकडे जात नाहीत. त्यामुळे मुस्लिम समाजाने आपल्या मुले व मुलींना चांगले शिकवून डॉक्टर व इंजिनिअर करावे. जेणेकरून त्यांच्या भावी पिढ्या साक्षर तयार होतील. समाजाला सुधारण्यासाठी शिक्षणाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, नगरपरिषद रूग्णालयाच्या महिला वैद्यकिय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, डॉ.अर्शिया शेख, मुख्य सेविका आशा चव्हाण, वैशाली सावदेकर, उज्ज्वला खलाणेकर, पुनम पाटील, लता जाधव, मलेरियाचे तालुका पर्यवेक्षक सुनील महाजन, डी.जी.चोपडे यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनिस व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर महिला पालकांनी बनविलेल्या विविध चविष्ट खाद्य पदार्थांचा आ.सावकारे यांनी आस्वाद घेतला. त्यापैकी तिघांना भेट वस्तू दिल्या. तसेच पहिल्या टप्प्यात २० अंगणवाड्यांसाठी आकार प्रशिक्षणाचे २० किट देण्याचे जाहीर केले. यानंतर खडकारोड परिसरात राष्ट्रीय पोषण मिशन व डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात आली.

Exit mobile version