Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देणार की नाही ? – आ.चंद्रकांत पाटील

मुक्ताईनगर प्रतिनिधी | तालुक्यातील अनेक गावांना चक्रीवादळाचा फटका बसून पिकांसह, घरांचीही पडझड झाली होती. “या नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देणार की नाही ?” असा प्रश्न आ.चंद्रकांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात विचारला. त्यावर उत्तर देताना राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सकारात्मक उत्तर दिले.

“रावेर, बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक गावांना चक्रीवादळाचा फटका बसला होता यात अनेक हेक्टरवरील केळी व इतर पिकांसह, घरांचीही पडझड मोठया प्रमाणावर झाली होती. यापैकी मेंढोळदे गावात तर पाचशेच्या वर घरांची पडझड झाल्याने पूर्ण गावंच उद्ध्वस्त झाले होते. दरम्यान मध्यंतरी शासनातर्फे याआधीच्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मदत स्वरूपात लाभ देण्यात आला होता.

परंतु मार्च ते मे २०२१ अखेर झालेल्या नुकसानी नंतर शेतकरी व नुकसानग्रस्तांना काहीही मदत मिळाली नसल्याने नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकात प्रचंड नाराजी पसरली आहे. शासनाच्या तसेच लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावरच ते आरोप करीत असून यासंदर्भात संबंधितांना सरकार नुकसान भरपाई देणार की नाही ?” असा असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुंबई येथील दोन दिवसीय सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पहिल्या दिवसाच्या कामकाजात विचारला. त्यावर उत्तर देताना राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी उर्वरित मदतीची रक्कम लवकरच देण्यात येईल असे जाहीर केले.

Exit mobile version