Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लॉकडाऊनमुळे जुगाराची कुप्रथा बंद होणार का ?

एरंडोल, रतीलाल पाटील । लागोपाठ दुसर्‍या वर्षी अक्षयतृतीयेवर लॉकडाऊनचे सावट असल्यामुळे या दिवशी जुगार खेळणार्‍यांची चांगलीच अडचण झाल्याचे दिसून येत आहे. अर्थात, कोरोनामुळे ही कुप्रथा मोडीत निघावी अशी अपेक्षा देखील आता व्यक्त करण्यात येत आहे.

आखाजी ( अक्षय तृतीया ) सण खान्देशात महत्वपूर्ण असतो . नवविवाहीत माहेरी येते.शेतकरी राजा नवीन सालदाराची निवड करतात.या सर्व परंपरा असल्या तरी आखाजीचा सण आणखी एका परंपरेमुळे प्रसिध्द असून ती म्हणजे पत्ते खेळणे.जुगारात पैशांची मोठी उलाढाल होणारा खेळ.रात्रंदिवस चालणारा हा खेळ एरंडोलला प्रसिध्द असून राज्यातील लांब लांबचे पट्टीचे खेळणारे जुगारी येवून पैसे ( लाखोंनी ) जिंकून जातात  परंतू मागील वर्षापासून कोरोनामुळे यंदा देखील परंपरा खंडीत होते की काय ? अशी चर्चा रंगू लागली आहे.

मागील वर्षी ठराविक ठिकाणी मंडप टाकून जुगार नसला तरी शहराजवळील शेतांमध्ये पत्त्यांचा खेळ चांगलाचा रंगला असल्याची चर्चा रंगली होती.त्यामुळे यंदा पट्टीचे खिलाडी कोणती शक्कल लढवितात याकडे लक्ष लागले असून पोलिसांपुढे खेळ उधळण्याचे मोठे आव्हान आहे.एक गोष्ट मात्र नक्की की कितीही कडक बंदोबस्त असला तरी नाट तर मोडणारच असाही संकल्प करून सिध्दीस नेणारे खिलाडी आहेत हेही तेवढेच खरे.

मागील वर्षापासून कोरोना महामारीमुळे नागरीक हैराण झाले असून हंगाम देखील हातातून गेला आहे. कामधंदा नाही त्यामुळे करावे काय ? या विवंचनेत अनेकजण आहेत.कपाशीला भाव मिळाला नाही , मुला – मुलींचे लग्न खोळंबलेले . त्यात कोरोनामुळे जीवलगांचा झालेला मृत्यू अशा परिस्थितीत उसनवारी कर्ज काढून पत्ते खेळणारे आहेतच . वास्तविक , पत्ते – जुगार , दारू हे संसाराची राखरांगोळी करणारे आहेत हे माहित असून देखील केवळ जिद्द म्हणून जुगार खेळणाऱ्यांना म्हणावे तरी काय ? मुला – मुलींच्या लग्नासाठी , मोठ्या आजारासाठी राखून ठेवलेले पैसे आखाजीच्या पत्ते खेळण्यामध्ये संपवून , हताश झालेले आत्महत्या देखील करतात . त्यामुळे कुटूंब उध्वस्त झाल्याची अनेक उदाहरणे असली तरी खेळणारे आहेत. एरंडोल पोलिसांनी निदान यंदातरी आखाजीचे पत्ते , खेळ जुगार होवू नये यासाठी परिसर पिंजून काढून मोठी उलाढाल थांबवावी आणि महिलांची सहानुभूती मिळवावी अशी महिला वर्गातून अपेक्षा बाळगली जात आहे.

 

Exit mobile version