Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुष्काळ जाहिर करण्याची सरकारकडे मागणी करणार – ॲड.रोहिणी खडसे

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शेतकरी बांधव आधीच बोगस खतांमुळे सुलतानी संकटात सापडलेला असताना पावसाने खंड दिल्याने आता अस्मानी संकटात सापडुन हवालदिल झाला आहे. यावेळी या कठीण प्रसंगात राष्ट्रवादी काँगेस पक्ष शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहे. तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असुन राज्य सरकारने दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळ जाहिर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सरकारकडे करणार आहोत, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनी सांगितले.

बोदवड तालुका हा अवर्षणग्रस्त तालुका म्हणुन ओळखला जातो. या तालुक्यात पाण्याचे मोठे स्त्रोत नसल्याकारणाने शेती सर्वस्वी पाऊसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, गेल्या महिना भरापासून पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. प्रतिकूल हंगामातील पिकांची परिस्थिती बिकट झाली असून, आगामी रब्बी हंगामातील पिकांचे भविष्य पावसाच्या आगमनावर अवलंबून आहे.  त्यातच या तालुक्यात मोठया प्रमाणावर बोगस खत विक्री होऊन शेतकरी बांधवांनी ते खत पिकांना वापरल्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे त्यातच आता गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे.

पाऊस  नसल्यामुळे शेतातील पिके सुकू लागली आहेत, त्यामुळे शेतकरी बांधव संकटात सापडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष  ॲड. रोहिणी खडसे यांनी आज बोदवड तालुक्यातील साळशिंगी येथे शेतात जाऊन पिकांची पाहणी करून परिस्थीतिचा आढावा घेतला. यावेळी ॲड. रोहिणी खडसे म्हणाल्या, सोयाबिन, मका, कपाशी हे पिके फुलोऱ्यावर आली आहेत आणि आता पाऊस लांबला आहे त्यामुळे पिके सुकत आहेत  पाऊस नसल्यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झालाय.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत (आबा) पाटील, बाजार समिती उपसभापती ज्ञानेश्वर पाटील,रामदास पाटील, वामन ताठे,प्रदिप बडगुजर, विजय चौधरी, अजय पाटील, विनोद कोळी, शाम पाटील, अतुल पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version