शिवसेनेला मराठी माणसाचा इतका आकस का ? : पडळकर

मुंबई प्रतिनिधी | बेळगाव महापालिकेत निवडून आलेले मराठी लोक असून ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले नाहीत म्हणजे ते मराठी नाहीत असे का ? शिवसेनेला मराठी माणसाचा इतका आकस का ? असे प्रश्‍न विचारत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

बेळगावच्या भाजपच्या विजयावर संजय राऊतांनी संताप व्यक्त केला होता. यावरून आज भाजपचे गोपीचंद पडळकर म्हणाले, संजय राऊतांना बेळगावमध्ये निवडून आलेले संतोष पेडणेकर, जयंत जाधव, सविता कांबळे, रवी धोत्रे, रेश्मा पाटील असे अनेक मराठी माणसं वाटत नाहीत का? कारण काय तर ते म्हणे ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत, म्हणून ते मराठीच राहिले नाहीत का? मराठी माणसाचा एवढा आकस? महाराष्ट्राच्या मतदाराने युतीला बहुमत दिले. पण नंतर तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. पाकिस्तानचे आणि कलम ३७० चे गोडवे गाणार्‍यांसोबत सत्तेचा मेवा तुम्ही खाताय. हे बेळगावलाच नाहीतर अखंड हिंदुस्थानाला समजले आहे. दिल्लीतल्या मॅडमला आणि युवराजांना सत्तेसाठी खुश करण्यासाठी तुम्ही वारकर्‍यांना गुन्हेगार ठरवून मराठीजणांचा सन्मान असलेल्या वारीवर दंडुकशाहीचा वापर केला असल्याची टीका पडळकरांनी केला.

पडळकर पुढे म्हणाले की,  बेळगावच्या मराठी माणसाने तुमच्या १५ कोटीच्या पेंग्वीन विकासाचं मॉडेल नाकारले आहे. हिंदू सण आले की तुम्ही निर्बंध लादता आणि इतरांचा सणासुदीला सत्तेसाठी मुजरे करता अशा तुमच्या पाखंडी वृत्तीचा बुरखा फाटलाय आणि तुमचा खरा चेहरा प्रत्येक हिंदूच्या पुढे उजळून आलाय, असा हल्लाबोल पडळकर यांनी केला.

Protected Content