Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ऐकलंत का ? : होम क्वॉरंटाईनचे बदललेत नियम !

मुंबई प्रतिनिधी | राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देतांना कोरोना रूग्णांसाठी होम क्वॉरंटाईनचे नियम बदलण्यात आल्याची माहिती दिली आहे.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ आणि टास्क फोर्सची संयुक्त बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शिफारस केल्यानुसार आता होम आयसोलेशनचे निकष बदलण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयानं सौम्य किंवा लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांच्या होम आयसोलेशनसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे  जारी केलीत. यात सात दिवसानंतर नियमांनुसार डिस्चार्ज दिला जाईल आणि अलगीकरण संपेल.होम आयसोलेशनचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

राजेश टोपे पुढे म्हणाले की, अँटिजन टेस्ट करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी आता चौका चौकात अँटिजन चाचणीसाठी बुथ उभारण्यात येणार आहे.  ज्यांची लस झालेली नाही त्यासाठी कठोर पावलं उचलणं आवश्यक असल्याचे टोपे यांनी सांगितले.  ज्यांना ज्या भाषेत समजतं, त्यांना त्याच भाषेत समजवणार असल्याचाही इशारा राजेश टोपे यांनी दिले. ते पुढे म्हणाले की, आता लॉकडाऊनची आज गरज नाही. पण रुग्णसंख्या पाहून निर्बंध लावणार. पण, निर्बंध तातडीने लागू होणार नाहीत. योग्यवेळी निर्णय घेण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात बाधितांची संख्या वाढत आहे. तीन दिवसात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होत आहे. ही चिंतेची बाब आहे. मात्र, त्यातील ९० टक्के लोकांना लक्षणे नाहीत. उर्वरित १० टक्क्यांमध्ये १-२ टक्के रुग्णालयात उपाचारासाठी दाखल आहे. ही एका अर्थाने सकारात्मक बाब असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.  सध्याच्या नियमांप्रमाणे बुस्टर डोस शासकीय रुग्णालयात घ्यावे लागणार आहे. मात्र, खासगी रुग्णालयांना त्यांच्या कर्मचार्‍यांना बुस्टर डोस त्यांच्याच रुग्णालयात देण्यास परवानगी देण्यात आली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

Exit mobile version