Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उमेदवारी दाखल करतांना डॉ. उल्हास पाटील यांचे मेळाव्याद्वारे शक्तीप्रदर्शन ( व्हिडीओ )

melawa

 

जळगाव प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्तीप्रदर्शन म्हणून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा शहरातील लेवा भवनात आज सकाळी 11 वाजता आयोजित केला होता. या मेळाव्याला दोन्ही पक्षांचे जिल्ह्यातील मान्यवर नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्यात बोलतांना उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनी रावेरची जागा काँग्रेसला दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक आणि राष्ट्रीय नेत्यांचे आभार मानले. जिल्ह्यातून आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांची एकजूट राहिल्यास जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी आज लोकसभेच्या निमित्ताने झालेल्या या जागा वाटपाचा निश्चित लाभ होवू शकतो तसेच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना यातून उर्जा मिळू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, भाजपाने गेल्या 15 वर्षात जिल्ह्याला काय दिले ? ते सांगावे. रेल्वेला थांबा देण्याव्यतीरिक्त त्यांचे काय काम दिसते, बोदवड योजना पुर्ण झाली नाही, केळीला फळांचा दर्जा मिळाला नाही. जिल्ह्यात सात बलुन बंधारे नियोजित होते ते देखील पुर्ण झाले नाही. रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांसाठी रिचार्जची योजना गेल्या 15 वर्षांपासून भाजपावाले सांगतायत, पण तेही पुर्ण झाले नाही. अशा परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जिल्ह्यातील दोन्ही जागा वाटून घेवून समन्वय साधला आहे. त्यामुळे दोघांनाही विजय नक्की मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पारोळ्याचे आमदार डॉ. सतिश पाटील म्हणाले की, आमच्याकडे ॲड. रविंद्रभैय्यांसारखा अनुभवी उमेदवार असतांनाही ही जागा काँग्रेसला देवून डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने जिल्ह्यात चैतन्य निर्माण झाले आहे. सध्या जिल्ह्यात राजकारणाचे चित्र भयावह आहे. कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण करून नामोहरम करण्याचा प्रकार होत आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आता हीच अखेरची संधी मानून नेटाने काम करण्याची गरज आहे. यावेळी आपण जिल्ह्यातील दोन्ही जागा निवडून आणल्या नाहीत आणि ही संधी गमावली तर भविष्यात आपल्याला जिल्ह्याला उमेदवारही मिळणार नाही, अशीही भीतीही त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्याचे नेते आणि विद्यमान जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी या भागातील आठ जागा निवडून आणण्याची दर्पोक्ती केली आहे. त्या महाजनला त्याची जागा दाखवा, त्याचा जामनेर मतदार संघातून डॉ. पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळण्यासाठी संपुर्ण जोर लावा, काहीही करा असे आव्हान दिले.

मेळाव्याला यांची होती उपस्थिती
या मेळाव्याला जिल्हा काँगे्रसच्या प्रभारी डॉ. हेमलता पाटील, प्रदेश सचिव माजी आ. शिरीष चौधरी, प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील, प्रदेश महिला आघाडीच्या अ‍ॅड. ललिता पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, शहराध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, अल्पसंख्यांकचे जिल्हाध्यक्ष मुनव्वर खान, जि.प.गटनेते प्रभाकर सोनवणे, जि.प.सभापती दिलीप पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, माजी शहराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, अ‍ॅड. अविनाश भालेराव, योगेंद्रसिंह पाटील, भगतसिंह पाटील, जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादी व अन्य सहकारी पक्षांचे नेते उपस्थित आहेत.

 

 

Exit mobile version