Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजकीय मनःशांतीसाठी मंदिरे उघडायची का ; शिवसेनेचा भाजपला टोला

मुंबई, वृत्तसंस्था । लोकांना मनःशांती मंदिरांच्या माध्यमातून मिळावी, पण कोरोनाचा स्फोट पुन्हा झालाच तर जबाबदारी विरोधी पक्ष घेणार का?, असा सवाल करतानाच मंदिरांची टाळी उघडायला हवीत, पण राजकीय मनःशांतीसाठी नकोत. आधी लोकांना जगवा, मग पुढचे पुढे पाहू, असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे.

राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी भाजपने घंटानाद आंदोलन केले. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिनी मंदिर उघडण्यासाठी आंदोलन होत आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्रं दैनिक ‘सामना’तून विरोधकांना झोडपून काढण्यात आलं आहे.

धार्मिक स्थळे उघडल्यानंतर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ राबवायचे हे लोकांना कळते असे देवेंद्र फडणवीस सांगतात. पण भाजपतर्फे जे घंटानाद आंदोलन झाले त्याची छायाचित्रे पाहिल्यावर समजले या ‘डिस्टन्सिंग’ची कशी जोरदार काशी झाली आहे.

मंदिरे उघडण्याच्या प्रश्नी विरोधकांनी धसमुसळेपणा करण्याआधी महाराष्ट्राची स्थिती समजून घेतली पाहिजे. ज्या ‘मनःशांती’चा उद्घोष राज्याचे विरोधी पक्षनेते करतात त्यांनी मनःशांतीचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे, असा हल्ला शिवसेनेने चढवला आहे.

सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे म्हणण्याची प्रथा आहे, पण सध्याच्या काळात विरोधी पक्षांपुढे सत्तेचे शहाणपण चालत नाही, असे म्हणणे अधिक व्यावहारिक ठरेल. विरोधी पक्ष नावाचा प्राणी कधी कोणत्या प्रश्नी उधळेल ते सांगता येत नाही. हा घंटानाद म्हणजे . विरोधी पक्षाचे हे आंदोलन नक्की धार्मिक होते की राजकीय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मशिदी उघडण्याची आरोळी दिली म्हणून भाजप पुढाऱ्यांनी राज्याच्या आरोग्याचा विचार न करता ‘घंटा’ वाजवणे हे बरे नाही. मुळात सर्वच धर्मीयांची प्रार्थनास्थळे का बंद करावी लागली? देवांना बंदिवान का व्हावे लागले? याचा सारासार विचार करून विरोधकांनी मतप्रदर्शन करणे गरजेचे आहे.

मनःशांतीचा मार्ग त्यागातून जात असतो. मनःशांती ही महात्मा गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, स्वामी विवेकानंद यांच्यासाठी असते, गौतम बुद्धाने मनःशांतीसाठी राज्याचा त्याग तर केलाच, परंतु कठोर साधनादेखील केली. असा त्याग सध्याचे राजकारणी करणार आहेत काय? दोन वेळची चूल पेटवणे हीच लाखोंसाठी मनःशांती असते, अनेकांना राजकीय खुर्चीप्राप्ती हाच मनःशांतीचा मार्ग वाटतो. क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांना फासावर जाण्यापूर्वी मनःशांती प्राप्त झाली होती. वीर बाजीप्रभू देशपांडे यांना पाच तोफांचे आवाज ऐकून कमालीची मनःशांती मिळाली होती. मनःशांती राष्ट्रीय, धार्मिक व सामाजिक कार्यातही असते, असा सल्ला शिवसेनेने भाजपला दिला आहे .

Exit mobile version