Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विरोधकांनी कितीही काडी केली तरी सर्व एकत्र : मुख्यमंत्री फडणवीस

.jpg

औरंगाबाद वृत्तसंस्था । विरोधकांनी कितीही काडी केली तरी सर्वजण एकत्र राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा टोला विरोधकांना लगावला. भाजप-शिवसेना युतीच्या औरंगाबाद येथील मराठवाडा विभागीय मेळाव्यात इतर घटकपक्षांना डावलण्यात आल्याच्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. येत्या 24 मार्च रोजी कोल्हापूर येथे महायुतीतील सर्व सहकारी पक्षांचे नेते उपस्थित राहतील, असं त्यांनी स्पष्ट केले आहे.

युतीच्या मेळाव्याला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या मेळाव्यात अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. खोतकर-दानवे हे एकत्र आल्यानं औरंगाबाद आणि जालन्यातील सर्व कार्यकर्त्यांना आनंद झाला. भाजप-शिवसेना युतीप्रमाणे खोतकर आणि दानवे यांच्यात फेविकॉलचा मजबूत जोड झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजप आणि शिवसेना एकमेकांना बोलले. पण मनाने कधीच वेगळे झालो नव्हतो. सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष कधीच एकत्र आले नाहीत. मातृभूमीवर प्रेम करणारे नेहमीच एकमेकांच्या सोबत राहतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मराठवाड्यातील आठही जागा भाजप-शिवसेनेच्या निवडून येतील यात अजिबात शंका नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी फडणवीस यांनी तत्कालीन आघाडी सरकारवर टीका केली. महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांना मिळाली नाही, इतकी मदत युती सरकारने दिली. ७० हजार कोटींची कर्जमाफी केली असं शरद पवार सांगतात, पण महाराष्ट्रात फक्त चार हजार कोटी रुपये दिले, हे ते सांगत नाहीत. १५ वर्षांत फक्त एकदा दिले तर डांगोरा पिटतात. पण आता तर दरवर्षी ७० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत, असं त्यांनी सांगितले.

Exit mobile version