Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

या नामांतरांना काय अर्थ ? : राज ठाकरे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाविकास आघाडी सरकारने सत्तेवरून उतरण्याआधी केलेल्या नामांतरांना कोणताही अर्थ नसून याचा अधिकार केंद्राला असल्याची टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे.

उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेवटच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव हे नामांतर करण्यात आले. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ज्या ठिकाणी उच्च न्यायालय, विमानतळ, विभागीय कार्यालय, रेल्वे, मुख्य पोस्ट ऑफिस अशी महत्त्वाची कार्यालये असतात. अशा शहरांची नावे केंद्र सरकारच बदलू शकते. तो अधिकार राज्य सरकारांना नाही.

राज यांनी पुढे म्हणाले की, नामांतर हे पूर्णपणे झाले नसून मुळात याबाबत काल फक्त प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा लागेल. त्यावर केंद्र सरकार निर्णय घेईल. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता असा निर्णय घेण्यामागचा हेतू कोणापासूनही लपू शकत नाही. अडीच वर्ष महाराष्ट्रात सरकार असताना या सरकारला हा निर्णय या कालावधीत का घ्यावा वाटला नाही? तसा प्रस्ताव करून त्यांनी केंद्र सरकारला का पाठवला नाही? मुळात जे काम आपले नाहीच, ते काम आपण केले असे सांगण्यात काय अर्थ आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारच्या नामांतराच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले आहे.

 

Exit mobile version