Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोदवड बाजार समितीतही आमचाच विजय होणार : खडसे

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर आ. एकनाथराव खडसे यांनी बोदवड बाजार समितीतही आपल्याच पॅनलचा विजय होणार असल्याचा दावा केला आहे.

मुक्ताईनगर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि मुक्ताईनगर पंचवार्षिक निवडणूक २०२३ -२०२८ साठी संचालक पदाची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली आहे. यात संचालक पदाच्या १५ पैकी १५ जागा बिनविरोध झाल्या असुन संपूर्ण संचालक हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आहेत.

या निवडणुकीत बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये- व्यक्तिशः मतदारसंघातून जंगले प्रशांत प्रल्हाद, बढे चंद्रकांत विनायक आणि पाटील निवृत्ती भिका यांची निवड झाली. महिला राखीव गटातून चौधरी सुरेखा पुंजाजी व झांबरे अलका एकनाथ यांनी विजय संपादन केला. इतर मागासवर्गीय मतदारसंघात झोपे प्रभाकर सोपान; अनुसूचित जाती मतदारसंघात भालशंकर प्रशांत (बाळा)प्रभाकर तसेच भटक्या जाती जमाती मतदारसंघात गोसावी मधुकर रामपुरी यांची अविरोध निवड झाली. तर सर्व साधारण सहकारी मतदारसंघातून बढे ज्ञानदेव लक्ष्मण; गव्हाळ शांताराम काशिनाथ; दुट्टे सोपान तुकाराम; पाटील गोपाळ चिंतामण; पाटील नरेंद्र मधुकर; पाटील दत्तू किसन आणि कपले पुंडलिक शंकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयाचे श्री काळे यांनी काम पाहिले त्यांना गोकुळ पोहेकर यांनी सहकार्य केले.

बिनविरोध निवडीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला. दरम्यान, या विजयानंतर आमदार एकनाथराव खडसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सध्या होऊ घातलेल्या बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत देखील आपल्या पॅनलला बहुमत मिळणार असल्याचा दावा केला.

राष्ट्रवादीच्या सर्वच्या सर्व १५ संचालकांची बिनविरोध निवड झाल्यानंतर माजी महसुल मंत्री आ एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, मुक्ताई सूतगिरणीच्या चेअरमन रोहिणीताई खडसे , जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, तालुका अध्यक्ष यू. डी. पाटील, सुधाकर पंढरी पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांचे निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.

Exit mobile version