Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बाळासाहेब आमचे म्हणून शिवसेनाही आमचीच ! : गुलाबराव पाटील

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहे. ते आमचे म्हणून शिवसेना देखील आमचीच आहे अशा शब्दांमध्ये गुलाबराव पाटील यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या १२ दिवसानंतर पहिल्यांदाच आपल्या समर्थकांना भेटण्यासाठी आलेल्या पाटील यांनी आपल्याला आजवर भरपूर काही मिळाल्याचेही आवर्जून नमूद केले.

गेल्या २० जूनपासून आधी सुरत, मग गुवाहाटी आणि नंतर गोव्यात असलेल्या आमदारांनी काल रात्री मुंबई गाठली. तर आज विधीमंडळात या आमदारांनी हजेरी लावली यात जळगाव ग्रामीणचे आमदार तथा ठाकरे सरकारमधील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचाही समावेश होता. आज विधीमंडळाचे कामकाज संपल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याप्रसंगी एबीपी-माझा या वाहिनीने त्यांची खास मुलाखत घेतली.

या मुलाखतीत गुलाबराव पाटील म्हणाले की, गेल्या ३५ वर्षांपासून मी स्वत: शिवसेनेचा झेंडा उचलला आहे. बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी दैवत आहे. ते महापुरूष असल्यामुळे ते कुणा एका परिवाराचे नाहीत. उध्दव ठाकरे हे सुध्दा आमचे नेते होते. मात्र काही घटना घडल्या, ज्या टाळता आल्या असता. आमदारांची नाराजी होती. यातून हा सर्व प्रकार घडला. शिवसेनेने आपल्याला खूप काही दिले. याचमुळे आपण शिंदे यांच्यासोबत जाण्याआधी मातोश्रीवर जाऊन ठाकरे साहेबांना सर्व काही सांगितले. जाणार्‍या आमदारांशी बोलायला हवे असे देखील सांगितले. मात्र ते न जमल्याने शिंदे सरकार सत्तारूढ झाल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हे आमचे असल्याने शिवसेना देखील आमचीच आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण शिवसेनेला पुढे घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर, सोशल मीडियात आपल्या आधीच्या पोस्ट व्हायरल झाल्या असतांना नंतर देखील पोस्ट व्हायरल होतील असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version