वाझे,शर्माच्या कृतीने पोलीस खात्यासह राज्याचा सन्मान वाढला का? – उपाध्ये

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझे यांनी प्रदीप शर्माकडे ४५ लाख रुपये दिल्याचे एनआयएने म्हटले आहे, यावरून वाझे, शर्मासारख्या पोलीस अधिकाऱ्याच्या कृतीने पोलीस खात्यासह राज्याचा सन्मान वाढला का? असा प्रश्न भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर समोर स्फोटके भरलेले वाहन उभे करीत संपूर्ण परिसरात दहशत निर्माण करणे. तसेच व्यापारी मनसुख हिरेनच्या हत्येचा कट प्रकरणी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांचा सहभाग असून मनसुख हिरेनच्या हत्येसाठी मारेकऱ्याना देण्यासाठी सचिन वाझेने प्रदीप शर्माकडे ४५ लाख रुपये दिले असे एनआयएने स्पष्ट केले आहे.
हत्या आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात असलेला माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेवरून, वाझे लादेन आहे का? असा प्रश्न विधिमंडळात विचारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाझेची पाठराखण केली होती.

वाझे प्रमाणेच प्रदीप शर्मा देखील शिवसेनेचे पदाधिकारी होते. शर्माने तर निवडणूकहि लढवली होती. राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला हा गुन्हा अधिकच गंभीर आहे. त्यात हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिले, एवढा पैसा सामान्य पोलीस अधिकाऱ्याकडे  आला कुठून, याचाही शोध घेतला जावा, तसेच हे दोन्ही पोलीस अधिकारी कुणाच्या तरी सांगण्यावरून गंभीर कृत्ये करत होते, यांची  उत्तरे  वाझेची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावी आणि ते जनते समोर आलेच पाहिजे. अशी मागणी सोशल मिडीयावर ट्वीट च्या माध्यमातून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

अगदी खोचक पद्धतीने बारीकसारीक  गोष्टीत राज्याचा अपमान शोधणाऱ्या शिवसेना नेत्यांना या पोलीस अधिकाऱ्यांच्या कृतीने पोलीस विभागासह राज्याच्या सन्मानात वाढ झाली आहे का? यांचे देखील उत्तर त्यांनी द्यावे अशी मागणीही उपाध्ये यांनी केली आहे.

Protected Content