Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात पुन्हा पाणीटंचाई!

छत्रपती संभाजीनगर-वृत्तसेवा । यंदाच्या वर्षी राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे बहुतांश भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक प्रकल्पात अल्प पाणीसाठा (Water Storage) उपलब्ध असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील 6 विभागांतील धरणांमधील पाणीसाठा अवघा 66 टक्क्यांवर आला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत हा पाणीसाठा 21 टक्के कमी आहे. तर, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आतापासूनच पाणीटंचाई जाणवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील जलाशयांमध्ये गतवर्षी 87.10 टक्के पाणीसाठा होता. यंदा अवघा 66.31 टक्के पाणीसाठा आहे. सद्यस्थितीला कोकण विभागातील धरणांमध्ये सर्वाधिक 82.63 टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी हाच पाणीसाठा 83.15 टक्के होता. छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा)विभागात सर्वाधिक कमी 37.63 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी या विभागातील धरणांमध्ये 87.31 टक्के पाणीसाठा होता. नागपूर विभागात  71.78 टक्के पाणीसाठा असून, गेल्यावर्षी 79.49 टक्के पाणीसाठा होता. अमरावती विभागात 75.62 टक्के पाणीसाठा असून, गेल्यावर्षी 91.52 टक्के पाणीसाठा होता. पुणे विभागात 70.39 टक्के पाणीसाठा असून, गेल्यावर्षी 88.08 पाणीसाठा होता. नाशिक विभागात 70.61 टक्के पाणीसाठा असून, गेल्यावर्षी  89.89 टक्के पाणीसाठा होता.

राज्यात 383 टँकरने पाणीपुरवठा…

राज्यात हिवाळ्यातच पाणी टंचाई जाणवत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून, अशा भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. राज्यात 363 गावं आणि 957 वाड्यांवर 383 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

नाशिक विभागात 155 गावं आणि 286 वाड्यांवर129  टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात 18 शासकीय आणि 111  खाजगी टँकर्सचा समावेश आहे.

पुणे विभागात 115 गावं आणि 649 वाड्यांवर 113 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात 25 शासकीय आणि 88 खाजगी टँकर्सचा समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभागात 96 गावं आणि 22 वाड्यांवर 141 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात 5 शासकीय आणि 136  खाजगी टँकर्सचा समावेश आहे

Exit mobile version