Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जलसंपदा विभागाकडून जोंधनखेडा धरणासाठी ३०.८४ कोटींचा निधी मंजूर

मुक्ताईनगर प्रतिनिधी । जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रालयात जळगाव जिल्ह्यातील सिंचन योजनासह प्रकल्पांची आढावा बैठक घेण्यात आली होती. यात कुंड धरणाची उंची वाढविणे व सांडव्याचे काम पूर्ण करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता व निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीनुसार, जोंधनखेडा धरणासाठी ३०.८४ कोटी निधीची मंजूरी मिळाली आहे.

एकनाथराव खडसे हे मागील युती शासनाच्या काळात पाटबंधारे मंत्री असताना त्यांच्या प्रयत्नातून जोंधनखेडा गावाजवळ गोरक्षगंगा नदीवर कुंड धरणाची निर्मिती करण्यात आली होती. या धरणामुळे कुऱ्हा पारंबी हिवरा परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झालेला आहे. परंतु गेल्या अनेक वर्षा पासून या धरणाच्या भिंतीची उंची वाढवावी व सांडव्याचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यात यावे अशी परिसरातील शेतकरी बांधवांची मागणी होती. हि मागणी लक्षात घेऊन आणि जिल्हयातील इतर प्रलंबित प्रकल्प मार्गी लागावे यासाठी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे जळगाव जिल्हयातील सिंचन प्रकल्पांची आढावा बैठक घेण्यात यावी अशी मागणी केली होती.

या मागणीला अनुसरून दि 20 ऑगस्ट 2021 रोजी मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्ह्यातील सिंचन योजनांची व प्रकल्पांची आढावा बैठक घेण्यात आली होती या बैठकीत जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी इतर सिंचन योजनां बरोबर कुंड धरणाची उंची वाढविणे व सांडव्याचे काम पूर्ण करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता व निधी मिळावा, अशी जयंतराव पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार जोंधनखेडा लघु पाटबंधारे योजनेस द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून या प्रकल्पास जलसंपदा विभाग दर सूची 2016- 17 वर आधारित 30. 84 कोटी इतक्या किंमतीस द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

यामुळे धरणाचे अपूर्ण असलेले काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यातून धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवाना लाभ होणार असल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

Exit mobile version