Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यार्थ्यांना प्रवासाची सोय न केल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा….

बोदवड प्रतिनिधी | विद्यार्थ्यांना प्रवासाची सोय न केल्यास बोदवड तहसील समोर रस्ता रोखो आंदोलन करण्यात येईल इशारा विद्यार्थी, पालक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

सामजिक कार्यकर्ते गणेश पाटील व शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष गजानन बेलदार यांचे अध्यक्षतेखाली तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

गेल्या दीड महिन्यापासून एसटीच्या संपामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे, त्यातच शाळा सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास भाडेसाठी खिशात पैसे नाही, खाजगी रिक्षाचे भाडे महागल्यामुळे शाळेचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या पार्श्वभूमीवर वराड बुद्रुक येथील गणेश पाटील व संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते गजानन बेलदार तसेच शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी मानमोडी, सुरवाडा, मुक्तळ, वराड ,जलचक्र, येथील विद्यार्थ्यांना घेऊन नायब तहसीलदार सुर्यवंशी यांना निवेदन दिले होते. मात्र आठ दिवसानंतरही त्याचा काहीही परिणाम झाला नाही तर याला जबाबदार कोण ? शासन, परिवहन मंत्री, राजकारणी, एसटीचे कर्मचारी ? याचा विचार करण्याची वेळ आली आहे असा सूर निवेदन देतांना उपस्थितांमध्ये उमटत होता.

विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाला जबाबदार असणाऱ्या अज्ञातांवर फौजदारी गुन्हे दाखल करा विद्यार्थ्यांची शाळेत येण्याची व्यवस्था करा. विद्यार्थ्यांच्या पालकांना एक महिन्याचा जास्त भाडे खर्च झाला त्याची भरपाई द्या. शिक्षण देत नसाल तर अधिकारी राजकारणी यांचे घरी साफसफाई करण्याचे विद्यार्थ्यांना काम द्या. आदी मागण्यांचे निवेदन गावांतून विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आले आहे. यावर सोमवार, दि. २० डिसेंबर २०२१ रोजी निर्णय न झाल्यास सोमवारी सकाळी ११ वाजता विद्यार्थी तथा पालक यांचेकडून बोदवड तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा कार्यकर्ते, विद्यार्थी तथा पालकांनी दिला आहे.

Exit mobile version