देशात युध्दजन्य स्थिती; दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा ! : राऊत

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशात कोरोनाच्या आपत्तीमुळे हाहाकार उडाला असून युध्दजन्य स्थिती उदभवली आहे. यामुळे केंद्र सरकारने संसदेचे दोन दिवसांचे विशेेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “देशात अभुतपूर्व आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडे गोंधळ आणि चिंतेचं वातावरण आहे. बेड नाही, ऑक्सिजन नाही आणि लसदेखील नाही. सगळीकडे गोंधळच गोंधळ आहे. या स्थितीवर चर्चा करण्यासाठी संसेदचं किमान दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं. जय हिंद!”

देशभरात कोरोनाचा कहर पहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांपासून दिवसभरात दोन लाखांपेक्षा जास्त रूग्ण आढळून आल्यामुळे अभूतपुर्व स्थिती निर्माण झाली आहे. यातच उपचारासाठी रूग्ण व त्यांच्या आप्तांचे हाल होत असल्याचेही दिसून येत आहे. ऑक्सीजन बेडची उपलब्धता, व्हेंटीलेटर्सची कमतरता आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार यांच्यामुळेही भयंकर स्थिती निर्माण झाली असल्याचे संजय राऊत यांनी अधोरेखीत केले आहे.

Protected Content