बोदवड नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबरला मतदान

बोदवड सुरेश कोळी | राज्य निवडणूक आयुक्तांनी आज केलेल्या घोषणेनुसार बोदवड नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार असून यामुळे येथील राजकीय वातावरण तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील विविध ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान तर; २२ डिसेंबर २०२१ मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी मुंबई येथे केली आहे. यात बोदवड येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीचा देखील समावेश आहे.

निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी १ ते ७ डिसेंबर २०२१ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. ४ व ५ डिसेंबर २०२१ रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी ८ डिसेंबर २०२१ रोजी होईल. मतदान २१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत असेल. २२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे.

निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार राखीव जागेवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर कोविड-१९ संदर्भात केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार व आवश्यक त्या उपाययोजना करून या निवडणुकांचा कार्यक्रम राबवावा. त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२० रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असेही निर्देश संबंधित जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे येथील राजकीय वातावरण तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. येथे प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जोरदार टक्कर होण्याची शक्यता आहे. या माध्यमातून माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील शक्ती प्रदर्शन देखील होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content