विद्यापीठात पत्रकारिता विभागातर्फे राज्यस्तरीय वेबीनारचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी |कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग, युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 26 जुलै 2022 रोजी ‘अपप्रचार आणि वस्तुस्थिती शोधन’ या विषयावर राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

फेक न्यूज किंवा अपप्रचार यांचे परिणाम समाज विघातक असून लोकांच्या मनात एकमेकांविषयी संभ्रम निर्माण करणारे आहे. बरेचदा आपल्याकडून अजाणतेपणीने चुकीच्या माहितीचे सोशल मीडियात प्रसारण केले जाते. त्यातून गैरसमज निर्माण होण्याचे प्रकार वाढून अविश्वासाचे वातावरण निर्माण होते.

त्यामुळे फेक न्यूज किंवा अपप्रचार यापासून सर्वांनी सजग राहणे गरजेचे असल्याचे मत युनिसेफचे माध्यम सल्लागार श्रुती गणपत्ये यांनी राज्यस्तरीय वेबिनारमध्ये व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून युनिसेफचे माध्यम सल्लागार श्रुती गणपत्ये बोलत होत्या.

वेबिनारचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे यांनी केले. यावेळी इंदौर येथील देवी अहिल्या विश्वविद्यालयाच्या जनसंवाद विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ. सोनाली नरगुन्दे हे देखील मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ. अनिल चिकाटे तर वेबिनारचे मुख्य आयोजक विभागप्रमुख प्रा.डॉ. सुधीर भटकर यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलताना श्रुती गणपत्ये म्हणाल्या फेक न्यूज तपासणीची तांत्रिक बाब समजून घेणे गरजेचे आहे. सोशल मीडियाद्वारे प्रसारित झालेली माहिती चूक किंवा बरोबर आहे याविषयीची उलट तपासणी करणे शक्य आहे. त्यासाठी इंटरनेटवर काही वेबसाईट आहेत ज्या माध्यमातून आपल्याला माहितीची सत्यता तपासून पाहता येते. वेबिनारमध्ये इंदौर येथील सोनाली नरगुन्दे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या काळात माध्यम साक्षरतेला अधिक महत्व आहे. केवळ सोशल मीडियाच नाही तर इतरही मीडियाद्वारे प्रसारित माहितीची सत्यता आपण तपासली पाहिजे.

उद्घाटन पर भाषणात विद्यापीठाचे प्र- कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे म्हणाले की, पत्रकारितेच्या विद्याथ्र्यांनी फेक न्यूज किंवा अपप्रचारापासून सावध राहिले पाहिजे. माहितीचे प्रसारण करताना ते वस्तुनिष्ठ आहे किंवा नाही याची तपासणी काळजीपूर्वक केली पाहिजे. पत्रकार हा समाजाला जागृत करणारा प्रहरी आहे. त्यामुळे पत्रकाराच्या हातून अपप्रचार होवू नये याची दक्षता त्याने घेतली पाहिजे. अपप्रचार आणि फेक न्यूज हे या आव्हानाचे नाव आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी सर्वांनी माहितीची खातरजमा करूनच ती माहिती सोशल मीडियावर पोस्ट करावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थांना दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.अनिल चिकाटे यांनी सांगितले की, प्रत्येकाने आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढविल्या पाहिजे. माध्यमातून प्रसारित माहितीची सत्यता तपासण्यासाठी माध्यम साक्षरतेची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.सुधीर भटकर यांनी केले. यावेळी त्यांनी वेबिनार आयोजनामागील भूमिका विशद करून अपप्रचार किंवा फेक न्यूज प्रसारित होण्यामागचा उद्देश सांगितला.

पाहुण्यांचा परिचय डॉ.गोपी सोरडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विनोद निताळे यांनी तर आभार डॉ.सोमनाथ वडनेरे यांनी मानले. या वेबिनारला सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्या देवी सोलापूर विद्यापीठाचे डॉ.रवींद्र चिंचोलकर यांच्यासह गडचिरोली, अमरावती, उदगीर, नाशिक येथील शिक्षकांचा विशेष सहभाग होता.

Protected Content