Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठात नॅक पुनर्मूल्यांक समिती दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नॅक पुनर्मूल्यांकनाच्या चौथ्या साखळीला सामोरे जात असून आज मंगळवार दि.२३ रोजी नॅक पिअर टीम विद्यापीठात दाखल झाली असून आज कुलगुरुंनी विद्यापीठाच्या प्रगतीचे सादरीकरण केले तर दुपारच्या सत्रात सर्व प्रशाळांच्या संचालकांनी शैक्षणिक प्रगतीचे सादरीकरण केले.

नॅक पिअर टीम विद्यापीठात तीन दिवस असून मंगळवारी सकाळी ही टीम विद्यापीठात दाखल झाली. या पिअर टीममध्ये चेअरमन आसाम विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. दिलीप चंद्रा नाथ, सदस्य समन्वयक प्रा. प्रशांत कुमार (बनारस हिंदु विद्यापीठ, वाराणसी), सदस्य प्रा. के. जयप्रसाद (केंद्रीय विद्यापीठ, कसारागोड, केरळ), प्रा. अभय आनंद बौराई (हेमवती नंदन बहुगुणा, गढवाल, केंद्रीय विद्यापीठ, उत्तराखंड) यांचा समावेश आहे. सकाळी विद्यापीठाच्या गांधी टेकडीवर या समिती सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीजवळ राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. त्यानंतर या प्रशासकीय इमारतीच्या पायऱ्यांवर दूतर्फा विद्यापीठ कर्मचारी व शिक्षकांनी उभे राहून समिती सदस्यांचे टाळयांच्या गजरात स्वागत केले.

प्रारंभी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचे सादरीकरण केले. त्यानंतर अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाचे सादरीकरण प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे यांनी केले. त्यानंतर स्वयंमूल्यांकन अहवालाच्या निकष निहाय सादरीकरण प्रा.व्ही.व्ही. गिते, प्रा.जयदीप साळी, प्रा.भूषण चौधरी, प्रा.सतीश कोल्हे, प्रा.अजय सुरवाडे, प्रा.मनीष जोशी, प्रा.प्रवीण पुराणिक यांनी केले. त्यानंतर विद्यापीठाच्या विश्रामगृहावर व्यवस्थापन परिषद सदस्यांसमवेत समितीने संवाद साधला. या संवादाच्या वेळी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु प्रा.एन.के.ठाकरे व माजी कुलगुरु प्रा.पी.पी. पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे देखील उपस्थित होते.

दुपारच्या सत्रात विद्यापीठाच्या विविध प्रशाळांच्या संचालकांनी आपल्या शैक्षणिक प्रगतीचे सादरीकरण केले. सायंकाळी या समितीने विद्यापीठ क्रीडा संकुलाला भेट दिली. सायंकाळी उशिरा विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.

Exit mobile version