Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिंगणघाट जळीत प्रकरणात विक्की नगराळे दोषी !

हिंगणघाट, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संपूर्ण राज्याला हादरा देणार्‍या हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातला आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला आज न्यायालयाने दोषी ठरविले असून त्याला उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

प्रा. अंकिता पिसुड्डे हिला जिवंत जाळणारा विक्की उर्फ विकेश नगराळे हत्या प्रकरणात दोषी सिद्ध झाल्याची माहिती ऍड. उज्ज्वल निकम यांनी दिली. आपल्याशी लग्न न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देणार्‍या विक्कीने अंकिताला एकतर्फी प्रेमातून जिवंत पेटवून दिले होते. या घटनेला दोन वर्षे झाली असून अंकिताच्या मृत्यूला उद्याच   दोन वर्षे पूर्ण होत आहेत.   पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कार्यालयीन कामकाजाच्या केवळ १९ दिवसांतच ४२६ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयातही या प्रकरणात ६४ सुनावण्या घेत २९ साक्षीदारांचे प्रत्यक्ष जबाब नोंदवण्यात आले आहेत.

अंकिता पिसुड्डे हिंगणघाटच्या स्व. आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. अंकिता आणि आरोपी हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावाचे रहिवासी होते.

३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ती आपल्या गावाहून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून ती कॉलेजच्या दिशेने जात असताना आरोपी विकेश नगराळे दबा धरुन बसला होता. अंकिता दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतून काढलेले पेट्रोल तिच्या अंगावर ओतले आणि तिला पेटवून दिले.

गंभीररीत्या जळालेल्या अवस्थेत अंकिताला नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु असताना आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर १० फेब्रुवारीला तिने अखेरचा श्वास घेतला. या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणात महिला तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाजाच्या १९ दिवसांत दोषारोप पत्र पूर्ण केले.

या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून शासनातर्फे ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती याप्रकरणी करण्यात आली. त्यामुळे प्रकरणाची जलद चौकशी करण्यात आली. यावेळी सरकारी पक्षातर्फे ऍड. उज्ज्वल निकम, ऍड. दीपक वैद्य यांनी भाग घेतला. बचाव पक्षातर्फे ऍड. भूपेंद्र सोने, शुभांगी कोसार, अवंती सोने आणि सुदीप मेश्राम यांनी सहकार्य केले. आज न्यायालयाने त्याला दोषी ठरविले असून आता उद्या त्याला काय शिक्षा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Exit mobile version