Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुलगुरू डॉ. पाटील यांच्यावर एनएसयूआयचे टिकास्त्र

जळगाव- आज जिल्हा दौर्‍यावर ती असलेले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत हे विद्यापीठांमध्ये आढावा बैठकीसाठी आले असता प्रशासनाच्या मार्फत कुलगुरू डॉक्टर पी. पी. पाटील यांनी बेकायदेशीरपणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची परवानगी दिल्याचा आरोप करत जिल्हा एनएसयुआय च्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी कुलगुरू यांचा निषेध करत टीकास्त्र सोडले आहे.

या संदर्भात जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुलगुरू हे विद्यापीठ प्रशासनाचे प्रमुख असतात त्यांनी आपल्या घटनात्मक पदाचा मान राखून विद्यापीठांमध्ये केवळ आणि केवळ शैक्षणिक दृष्टिकोन ठेवून सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक देऊन विद्यापीठांमध्ये शैक्षणिक प्रगतीचे वातावरण निर्माण करणे गरजेचे असते. परंतु डॉक्टर पाटील यांनी कुलगुरू या पदाला काळीमा फासत भाजप व संघ विचारधारेचा प्रचाराचा विडा हातात उचलत भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना झुकते माप देत विद्यापीठ प्रशासनाचा संपूर्ण परिसर या एका विशिष्ट विचारधारेच्या संघटनेला गहाण ठेवलेला आहे. त्या अनुषंगाने आज देखील ज्या विद्यापीठ प्रशासनाच्या प्रमुखाला म्हणजेच कुलगुरूंना इतर दुसर्‍या संघटनेच्या कार्यकर्त्यांना व विद्यापीठांमध्ये शिकत असलेल्या सामान्य विद्यार्थ्यांना कुलगुरूंना भेटण्याकरता कुलगुरूंची भेटीची वेळ मिळत नाही. 

यात पुढे म्हटले आहे की, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विद्यापीठांमध्ये आढावा बैठकीसाठी आले असता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना मात्र विद्यापीठाच्या बाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना व कुठल्याही राजकीय गर्दी होणार्‍या कार्यक्रमांवरती बंदी असताना कुलगुरू व विद्यापीठ प्रशासनाने मात्र या कार्यकर्त्यांना विद्यापीठामध्ये बेकायदेशीरपणे घुसवून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना अडचणीत आणण्याकरता आंदोलन करण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे आता विद्यापीठ प्रशासनाचे प्रमुख यांनी केवळ भाजप विचारधारेचे गुण आत्मसात न करता त्याहीपुढे जाऊन संघाचा पोषाख परिधान करून विद्यापीठांमध्ये बसावे त्याकरता त्यांना जळगाव जिल्हा एनएसयुआय च्या वतीने संघाचा पोशाख भेट देणार असल्याचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी सांगितले. 

दरम्यान, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांना आढावा बैठकीचे आमंत्रण दिले नसल्याने हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप देखील देवेंद्र मराठे यांनी केला आहे. दिलीप रामू पाटील यांनी कुलगुरू डॉक्टर पी पी पाटील यांना हाताशी धरून नामदार उदय सामंत यांना अडचणीत आणण्याकरिता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते विद्यापीठांमध्ये बेकायदेशीरपणे घुसून आंदोलन करण्याची परवानगी दिली. व्यवस्थापन परिषद सदस्य व कुलगुरू यांच्या या कृत्याचा एनएसयुआय निषेध करत असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

Exit mobile version