Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वीर जवान भानुदास पाटील यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  | अमर रहे…, अमर रहे… वीर जवान भानुदास पाटील अमर रहे…’च्या घोषात आज सकाळी कुसुंबे, ता.जि.जळगाव येथे वीर जवान भानुदास कौतीक पाटील यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जवान भानुदास पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत श्रध्दांजली वाहिली. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनीही वीर जवान भानुदास पाटील यांच्या घरी सांत्वनपर भेट देत श्रद्धांजली अर्पण केली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात आला.

भारतीय सैन्य दलातील भुज‌  येथील १२४९ डीएससी (डिफेन्स सेक्युरिटी कॅम्प) प्लाटून ७५ इन्फेंन्ट्री ब्रिगेड येथे ते सेवारत होते. कर्तव्य बजावत असताना जवान भानुदास कौतीक पाटील (वय ५५) यांचा शनिवारी, ३० डिसेंबर रोजी आकस्मिक मृत्यू झाला. दरम्यान, शहीद जवानाची वार्ता कुंसुबेला धडकताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. त्यांचे पार्थिव आज सकाळी कुसुंबे, ता.जि.जळगाव येथे आणण्यात आले. त्यानंतर सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यानिमित्त ग्रामस्थांनी अंगणात रांगोळ्या रेखाटल्या होत्या. शालेय विद्यार्थी हातात तिरंगा घेवून ‘अमर रहे…, अमर रहे….. वीर जवान भानुदास पाटील अमर रहे’ सह भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत होते.

वीर जवान भानुदास पाटील यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा तहसीलदार अर्पीत चव्हाण, तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, डिफेन्स सेक्युरिटी कॅम्पचे सुभेदार अवतार सिंह, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे हवालदार रतिलाल महाजन, लक्ष्मण मनोरे व सुगंध पाटील, सरपंच यमुना ठाकरे, पोलीस पाटील राधेश्याम चौधरी यांचेसह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलीस दलाच्या तुकडीने हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. सैन्य दल व माजी सैनिकांनीही वीर जवानास अभिवादन केले. वीर जवान पाटील यांचा मुलगा सचिन यांनी मुखाग्नी दिला. त्यांचे मागे आई, पत्नी, एक मुलगा , एक मुलगी, तीन भाऊ व तीन बहिणी असा परिवार आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील श्रद्धांजली वाहतांना म्हणाले की, आपल्या जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भानुदास पाटील यांच्या कुटुंबीयांस महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

यावेळी वीर जवान भानुदास पाटील यांचे कुटुंबीय, सैन्य दलाचे अधिकारी, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक, आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version