कामांना गती देण्यासाठी भाजपचे घंटानाद आंदोलन

भुसावळ प्रतिनिधी | प्रशासक राजवटीत शहरातील कामे अतिशय संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करत या कामांना गती देण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

सध्या वरणगाव पालिकेवर प्रशासकीय राजवट असून अनेक योजना संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे भाजपतर्फे सोमवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. आंदोन घाल्यानंतर मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, वरणगाव शहरासाठी भाजपाच्या काळात मंजूर केलेली पाणीपुरवठा योजनेचे काम हे कंत्राटदार संथगतीने करीत आहे, ते काम जलद गतीने करावे. यात जलकुंभ, अंतर्गत जलवाहिनी व जॅकवेलच्या कामाला गती मिळावी, भोगावती नदीचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, तीन कोटी रुपये किमतीचा सांडपाणी प्रकल्प बंद आहे, तो सुरू करण्यात यावा, तसेच नागेश्वर तीर्थक्षेत्र मंदिराचे काम बंद आहे हे त्वरित सुरू करावे, सिद्धेश्वरनगर येथील घरकुल जागा मोजणीचे शुल्क पूर्ण भरण्यात यावे, अक्सा नगर येथील शौचालयाची दुरुस्ती, वरणगाव शहरात संपूर्ण स्वच्छता, यासह इतर मागण्या करण्यात आल्या. यावेळी मुख्याधिकारी समीर शेख यांनी मागण्यांबाबत त्वरीत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, माजी उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसुफ, गोलू राणे, ज्ञानेश्वर घाटोळे, ए.जी.जंजाळे, मिलिंद भैसे, सुभाष धनगर, डॉ.सादिक साबीर कुरेशी, मुस्लिम अन्सारी, गजानन वंजारी, प्रणिता पाटील, संगीता माळी, नीता तायडे आदींची उपस्थिती होती.

Protected Content