Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वरणगाव नगरपालिका निवडणुकीसाठी झटून कामाला लागा- डॉ. उल्हास पाटील

भुसावळ प्रतिनिधी । काँग्रेस पक्ष सर्वसमावेशक असून आगामी नगरपालिका निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यानीं झटून कामाला लागण्याचे आवाहन माजी खासदार तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी केले. ते वरणगाव येथे पक्षाच्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते.

वरणगाव नगरपालिका निवडणुकीचे वारे सध्या वाहत असून काँग्रेस पक्षानेही याची तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने येथे पक्षाचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते याचे उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. उल्हास पाटील म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा सर्वसमावेशक असून सर्वांच्या हिताचा विचार करणारा आहे. शहर व परिसरातील नागरिकांची कामे झाली पाहिजे. तसेच शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचल्या पाहिजे. त्यांना येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायचे आहेत. शासनाची कामे जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे. आगामी निवडणुकीसाठी आपली ताकद व संघटन वाढवण्यासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन डॉ.उल्हास पाटील यांनी केले. आगामी नगरपालिका निवडणुकीत पक्ष चांगले यश संपादन करणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पक्षाचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक योगेंद्र पाटील, भुसावळ तालुक्याचे पक्ष निरीक्षक जमिल शेख, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष विवेक नरवाडे, रवींद्र निकम, इस्माईल गवळी, शहराध्यक्ष के.बी. काझी आदींसह ज्ञानेश्‍वर पाटील, मनोज देशमुख, राजेंद्र पालीमकर, मुस्लिम अन्सारी, जितेंद्र राणे, जयंता सुरपाटणे, शैलेश बोदडे, सुदर्शन जाधव, अतुल चौधरी, मनोज चव्हाण, प्रकाश भैसे, कल्पना तायडे आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version