भुसावळ तालुका भाजपमुक्त करणार – संतोष चौधरी

वरणगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ व वरणगाव नगरपालिकांसह ग्रामपंचायतींमध्ये विजय संपादन करून भुसावळ तालुका भाजपमुक्त करणार असल्याची घोषणा माजी आमदार संतोष चौधरी यांनी येथे केली. ते येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

वरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याला पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, माजी आमदार संतोष चौधरी, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, उपाध्यक्ष वाय.आर. पाटील, ओबीसी सेल उत्तर महाराष्ट्र प्रभारी उमेश नेमाडे, सुधाकर जावळे, नाना पवार, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, संतोष माळी, नितीन धांडे, उल्हास पगारे, माजी नगराध्यक्ष अरुणा इंगळे, नंदा निकम, रोहिणी जावळे, दुर्गेश ठाकूर, उल्हास पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.

या मेळाव्यात बोलतांना माजी आमदार संतोष चौधरी यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, भुसावळ व वरणगाव नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावणार असून तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता मिळवण्यात येणार आहे. यातून भुसावळ तालुका भाजपमुक्त करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तर विरोधकांनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी नगरपालिकेतील सत्ताधार्‍यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. सत्ताधारी हे शहरवासियांना पाणी पुरवठा करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. तर पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, गफ्फार मलिक, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी देखील या मेळाव्यास मार्गदर्शन केले.

Protected Content