Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. हिरा बाविस्कर एल.एल.बी. उत्तीर्ण

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील शिवम पॅथॉलॉजीच्या तज्ञ एम.डी. डॉक्टर हिरा बाविस्कर यांनी नुकतीच विधी क्षेत्रातील एल.एल.बी. पदवी प्राप्त केली असून वकिलीची ही उच्च पदवी प्राप्त करणाऱ्या त्या परिसरातील पहिल्या डॉक्टर ठरल्या आहे.

विशेष म्हणजे वैद्यकीय सेवा देत असताना आपला प्रपंच सांभाळून धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात एलएलबीला इंग्रजी माध्यमातुन नियमित प्रवेश घेऊन त्यांनी हे यश साध्य केले आहे. एवढेच नव्हे तर अंतिम वर्षात तब्बल 84 टक्के गुण मिळवत सर्व टॉपर विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी स्थान मिळविले आहे. यावरून जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असली तर आपण कधीही काहीही साध्य करू शकतो हेच त्यांनी सिद्ध करत एक चांगला संदेश आजच्या पिढीला दिला आहे. आपल्या बालपणी राहुरीतील शाळा महाविद्यालयात सतत अव्वल क्रमांक मिळवून त्या टॉपर राहिल्या आहेत. त्यानंतर 12 वीत गुणवत्ता सिद्ध केल्याने 2000 साली पुणे येथील बी जे मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले.

त्यानंतर 2005 साली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथून पॅथॉलॉजी ची एम. डी. ही मास्टर पदवी प्राप्त केली. नंतर 2006 साली दिल्ली विद्यापीठातुन पॅथॉलॉजी विषयात डीएनबी ही वैद्यकीय शास्त्रातील उच्च पदवी मिळविली. त्यानंतर अमळनेरातील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ शरद बाविस्कर यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर आपल्या शिवम पॅथॉलॉजीत सेवारत झाल्या असताना शिक्षणाची ओढ कायम असल्याने आता 2022 साली एलएलबी देखील त्या उत्तीर्ण झाल्या आहेत.

केवळ शिक्षणातच नव्हे तर इतर कलागुणात देखील त्या अग्रेसर असून गेल्या सहा वर्षांपासून पर्यावरण पूरक शाडू मातीच्या सुबक गणपती मुर्त्या स्वतः बनवून काही मंडळांना देखील त्यांनी आवड म्हणून बनवून दिल्या आहेत. याव्यतिरिक्त आपले पती डॉ. शरद बाविस्कर यांच्या सोबत इतर कलाकृती देखील नेहमीच त्या साकारत असतात. एलएलबी पदवी प्राप्त केल्यानंतर डिप्लोमा इन मेडिकोलीगल सिस्टीम हा कोर्स करण्याचा त्यांचा मानस आहे.

सदर एलएलबीचे यश मिळविल्याबद्दल सर्वच क्षेत्रातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.

Exit mobile version