Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कापूस पिकाची उत्पादकता वाढविण्यास ड्रिप फर्टिगेशन तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा – डॉ. बी. डी. जडे

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कापूस पिकाची उत्पादकता वाढविण्यास ड्रिप फर्टिगेशन तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज असल्याचं डॉ. बी. डी. जडे यांनी सांगितलं. महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ उदयपूर (राजस्थान) येथे आयोजित राष्ट्रीय कापूस परिषदमध्ये ‘ड्रीप फर्टिगेशनचा कापूस पिकामध्ये वापर’ या विषयावर संशोधन प्रबंध सादर करतांना ते बोलत होते.

“आपल्या देशात कापूस पिकाचे १२२ लाख हेक्टर क्षेत्र असून उत्पादकता ४६१ किलो रूई प्रति हेक्टर आहे. जागतिक पातळीवर कापूस पिकाची उत्पादकता ७९१ किलो रुई प्रति हेक्टर आहे. देशात सरकीसह कापसाची उत्पादकता एकरी ५.६४ क्विंटल आहे तर राज्यात सरकीसह कापसाची उत्पादकता एकरी ३.७५ क्विंटल एवढीच आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी कापूस पिकाचे अधिक उत्पादन मिळण्याकरीता ड्रिप फर्टिगेशन (ठिबक सिंचन आणि ठिबक मधून विद्राव्य खतांचा वापर) करणे काळाजी गरज आहे.” असे विचार जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी विस्तार व प्रशिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. बी. डी. जडे यांनी मांडले.

 

कापूस संशोधन आणि विकास संघटना हिसार (हरियाना) ह्यांनी भारतीय कृषी अनुसंधान संस्थान दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानं महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ उदयपूर (राजस्थान) येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय कापूस परिषदमध्ये संशोधन प्रबंध सादरीकरण करताना डॉ. बी. डी. जडे बोलत होते.

कापूस संशोधन आणि विकास संघटना यांनी डॉ. बी. डी. जडे यांना ‘ड्रीप फर्टिगेशनचा कापूस पिकामध्ये वापर’ या विषयावर सादरीकरणाकरिता आमंत्रित केले होते. “कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एकरी कापसाचे झाडांची संख्या वाढविण्याची गरज आहे. परिषदेमध्ये कापूस पिकाचे उत्पादन वाढण्याकरिता काय आमुलाग्र बदल केले पाहिजेत.” ते बी. डी. जडे ह्यांनी सुचविले. कोरडवाहू कापूस पिकाचे एकरी १० क्विंटल आणि ठिबक सिंचनावर एकरी २० क्विंटल उत्पादन कसे घ्यावे हे कॉटन मिशन १.० सुरु असलेल्यांमध्ये देशभरात मार्गदर्शन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या परिषदेसाठी कापूस पिकामध्ये काम करणारे पंजाब, हरीयाना, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू, तेलंगना आणि ओरिसा, दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ संशोधक, खाजगी बियाणे, किटक नाशके, औजारे कंपन्याचे अधिकारी ह्यांनी परिषदेमध्ये सहभाग घेतला. राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, व. ना. मराठवाडा कृषी विद्यापीठ, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर मधील शास्त्रज्ञ ह्यांनी या परिषदेमध्ये शोध निबंध सादर केले.

कापूस पिकातील सुधारीत वाण, लागवडीचे अंतर, एकरी झाडांची संख्या, कापूस पिकातील किडी आणि रोग, कापूस वेचणी यंत्र या विषयावर परिषदेमध्ये शास्त्रज्ञांनी विचार मांडले. कापूस पिकाची उत्पादकता वाढविण्याकरिता सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज असल्याचे कुलगुरु डॉ. मेहता, डॉ. कुंभोज, डॉ. तोमर यांनी मांडले. कापूस संशोधन व विकास संघटनाचे सचिव डॉ. एम. एस. चौहान यांनी परिषदेचे आयोजन केले.

Exit mobile version