Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना; अमेरिकेचा महसुली तोटा ३३०० अब्ज डॉलरनी वाढण्याची भीती

नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेची आर्थिक दातखिळी बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेचा महसुली तोटा तब्बल ३३०० अब्ज डॉलर इतका विक्रमी स्तरापर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

अमेरिकन काँग्रेसने एक अहवाल तयार केला आहे. अमेरिकेची चालू वर्षातील अर्थसंकल्पी तूट ३३०० अब्ज डॉलरपर्यंत वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. ट्रम्प प्रशासनाने २००० अब्ज डॉलर्सचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. या पॅकेजमुळे नुकसान अधिक वाढणार आहे, असे काँग्रेसने म्हटलं आहे.

यंदाचा अर्थसंकल्पी तोटा २०१९ च्या तुलनेत तीनपट अधिक असेल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २००८ मध्ये आलेल्या महामंदीनंतर अमेरिकेसाठी हे दुसरे मोठे नुकसान ठरणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासन करोना रोखण्यासाठी प्रचंड खर्च करत आहे. तर मंदी आणि नोकऱ्या गेल्याने अमेरिकन नागरिकांचे उत्पन्न कमी झाले आहे. परिणामी कर महसुलात मोठी घट झाली आहे. यंदा आयकर वसुलीत ३४ टक्के घसरण झाली आहे. बेरोजगारांना अमेरिकेत १२०० डॉलर्सचा भत्ता मिळत आहे.

बड्या अर्थव्यवस्थांपैकी केवळ चीनचाच विकासदर पहिल्या तिमाहीत सकारात्मक राहिला आहे. जूनअखेर चीनचा विकासदर ३.२ टक्क्यांवर पोहोचला. या तिमाहीत अमेरिका आणि जपानच्या जीडीपीत अनुक्रमे ९.५ टक्के आणि ७.६ टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे. जर्मनीच्या जीडीपीतही १०.१ टक्क्यांची घसरण झाली आहे. याच तिमाहीत इटली, कॅनडा आणि फ्रान्सच्या विकासदरातही अनुक्रमे १२.४ टक्के, १२ टक्के आणि १३.८ टक्क्यांची घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण भारतीय अर्थव्यवस्थेत नोंदविण्यात आली असून, पाठोपाठ २०.४ टक्क्यांसह इंग्लंडचा क्रमांक लागला आहे.

Exit mobile version