Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ट्रम्प यांचे विशेषाधिकार कमी करण्याचा ठराव अमेरिकन संसदेत मंजूर

Donald Trump

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था | इराण आणि अमेरिका यांच्यामधील राजकीय संबंध प्रचंड ताणवपूर्ण बनले आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांना हल्ल्यांच्या धमक्या दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एकूणच कृती युद्धाला पोषक ठरत आहे. त्यामुळे केव्हाही या दोन्ही देशांमध्ये युद्धाचा भडका उडू शकतो. याचे परिणाम केवळ इराण आणि अमेरिकेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला भोगावे लागू शकतात. याची जाणीव झाल्याने अमेरिकेच्या संसदेने ट्रम्प यांचे विशेषाधिकार कमी करण्याबाबतचा एक ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांना इराणवर पलटवार करण्याची खुली मुभा मिळणार नाही.

 

डेमोक्रेटिक पक्षाच्या खासदारांनी आपले बहुमत असलेल्या कनिष्ठ सभागृहात अर्थात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे अधिकार कमी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव १९४ मतांच्या बहुमताने मंजूर करण्यात आला. यानंतर आता तो संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच सिनेटमध्ये मांडण्यात येणार आहे.

डेमोक्रेटिक पक्षाचा आरोप आहे की, ट्रम्प यांनी संसदेला माहिती दिल्याशिवाय इराकमध्ये इराणचे कमांडर जनरल सुलेमानी यांच्या ताफ्यावर ड्रोन हल्ल्याची परवानगी दिली होती. यानंतर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी अमेरिकेच्या खासदारांना पत्र लिहून राष्ट्राध्यक्षांच्या सैन्य कारवायांवर मर्यादा घालण्याचा प्रस्ताव मांडला होता.

गेल्या आठवड्यात इराकची राजधानी बगदादमध्ये इराणच्या लष्कराचे सुप्रीम कमांडर कासिम सुलेमानी यांचा अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला होता. या हल्ल्यामुळे चिडलेल्या इराणने अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली होती. त्यानुसार इराणने बुधवारी बगदादमध्येच असणाऱ्या अमेरिकेच्या सैन्य तळांवर अनेक क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. यामध्ये १८ जण ठार झाल्याचा दावा करण्यात आला होता. इराणने हे पाऊल उचलल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती वाढली आहे.

Exit mobile version