Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रपती पदासाठी युपीए उमेदवार देणार :काँग्रेसचा पुढाकार

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे गुरुवारी दुपारी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर लागलीच युपीएचे प्रमुख नेत्यांची बैठक होऊन राष्ट्रपती पदासाठी युपीए उमेदवार देण्याची कल्पना मांडण्यात येऊन काँग्रेसने यात पुढाकार घेतला आहे.

देशाच्या १५ व्या राष्ट्रपतींच्या नियुक्तीसाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी मतमोजणी केली जाईल, अशी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची घोषणा गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली. त्यानुसार लगेचच विरोधकांकडून संयुक्त उमेदवार देण्यासंदर्भांत हालचाली सुरु झाल्या आहेत.
विरोधकांचा संयुक्त उमेदवार उभा करण्याची कल्पना गेल्या बैठकीत मांडण्यात आली होती. ती प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. राष्ट्रपती पदासाठी संयुक्त उमेदवार देण्याविषयी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते तथा राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे निरीक्षक म्हणून मुंबईत तळ ठोकून असलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांनी शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. तसेच सोनिया गांधींनी अन्य विरोधी पक्षातील डीएमके, तृणमूल तसेच शिवसेनेचे उध्दव ठाकरे आदी नेत्याशी चर्चा करुन कोणाला उमेदवारी देता येईल यासंदर्भात चाचपणी केली जाणार असल्याचे म्हटले आहे.
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पुन्हा दुसऱ्यांदा संधी दिली जाण्याची शक्यता नाही. नवे राष्ट्रपती बिनविरोध निवडीसाठी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (एनडीए) प्रयत्न केले जात आहेत. मात्र विरोधकांकडून देखील राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार रिंगणात उतरवला जाण्याची शक्यता असल्याने संभाव्य उमेदवारांसंदर्भांत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Exit mobile version