नूतन मराठा महाविद्यालयात ‘करिअर कट्टा’ फलकाचे अनावरण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  विद्यार्थ्यांसाठी नोकरी आणि व्यवसाय या दोघांची सांगड घालण्यात भरीव कामगिरी करणाऱ्या ‘करिअर कट्टा’च्या फलकाचे अनावरण नूतन मराठा महाविद्यालयात करण्यात आले.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, जळगाव शिक्षण सहसंचालक डॉ.संतोष चव्हाण, करिअर कट्टाचे जिल्हा समन्वयक प्रा.डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख जळगाव, जिल्हा समन्वयक प्रा.संजय शिंगाणे, प्रा.सौ क्रांती पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.जे.पाटील, प्रा.डॉ.बडगुजर यांच्या उपस्थितीत ‘करिअर कट्टा’च्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

‘करिअर कट्टा’च्या आयोजनामगील हेतू आणि उद्देश उच्च शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील, तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचा स्पर्धा परीक्षा मधील उत्तीर्ण होण्याची टक्केवारी वाढवावी असा आहे.’ असे प्रतिपादन प्रा.बी.सी. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात नमूद केले. यशवंत शितोळे यांनी ‘करिअर कट्टाचे स्वरुप वैशिष्ट्य आणि गरज’ समजावून सांगताना विविध संदर्भ दिले.

‘आजतागायत कट्ट्यावर चर्चिले गेलेले म्हणजे कट्यावर हजर नसलेल्या मित्र मैत्रिणींचे विषय, काल सिरियलमधे घडलेल्या घटना, मित्र मैत्रिणींचे ब्रेकअप असे पारंपरिक विषय बदलून स्पर्धा परीक्षा व उद्योग क्षेत्रातील झपाट्याने होणारे बदल लक्षात घेऊन ते विषय कट्यावर आणण्यासाठी’ करियर कट्याचे आयोजन असून यातून राबविण्यात आलेल्या उपक्रमात आठवड्यातून तीनदा आय.ए.एस/ आय.पी.एस आपल्या भेटीला आणि उर्वरित दिवसात ‘उद्योजक आपल्या भेटीला’ अशा अभिनव उपक्रमांसोबतच यु.पी.एस.सी. आणि एम.पी.एस.सी. प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव म्हणजे जवळपास वर्षभराचे व्यस्त नियोजन या करियर कट्टाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर पर्यत नेऊन ठेवते’ असेही त्यांनी नमूद केले.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले डॉ.एन.जे.पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘अभ्यासक्रमात असलेले सगळेच विषय महत्त्वाचे असतात. म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचा विषय निवडून करियरचा मार्ग शोधला पाहिजे, स्वताची पात्रता ओळखून विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने योजना आखून बी. प्लॅन देखील डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि या सगळ्या बाबी अधिक स्पष्टपणे समजून घ्यायच्या असतील तर करियर कट्टा हे एक उत्तम माध्यम असल्याचंही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभारप्रदर्शन प्रा.रविकांत मुंडे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा राजेंद्र देशमुख, प्रा.आर बी देशमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

 

Protected Content