Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कृषीमित्र स्व. हरीभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त केळी परिसंवाद !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी खासदार व आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष दिवंगत हरीभाऊ जावळे यांच्या जयंतीचे औचित्य साधून फैजपूर येथे केळी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

माजी खासदार स्व. हरीभाऊ जावळे यांची दिनांक ४ ऑक्टोबर रोजी जयंती असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचेच औचित्य साधून आदल्या दिवशी म्हणजे ३ ऑक्टोबर रोजी केळी उत्पादक आणि उदयोन्मुख केळी निर्यातदारांसाठी केळी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा केळी परिसंवाद फैजपूर-यावल रोडवरील सुमंगल लॉन येथे सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेच्या दरम्यान आयोजीत करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे या परिसंवादाचे उदघाटन राहणार आहेत. तर कार्यक्रमाला ख्यातनाम केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील हे केळीचे अन्नद्रव्य आणि करपा, पीटींग व सीएमव्ही रोगाचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करतील. प्रख्यात केळी निर्यातदार किरण ढोके हे केळी उत्पादक ते केळी निर्यातदार : यशस्वी प्रवास यावर मार्गदर्शन करतील. तर, युवा केळी निर्यातदार बलरामसिंग सोळंके हे केळी निर्यातीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, आयात-निर्यात प्रक्रिया, बँक हमी आणि जागतिक बाजार या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

कृषीमित्र स्व. हरीभाऊ जावळे मित्र परिवारातर्फे आयोजीत या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्णपणे अराजकीय कार्यक्रम असून फक्त आणि फक्त केळी उत्पादक आणि निर्यात करण्यासाठी इच्छुक शेतकर्‍यांच्या हितासाठी आहे. यात कोणत्याही राजकीय व्यक्तीऐवजी त्या-त्या विषयातील तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. तर परिसरातील केळी उत्पादक आणि निर्यात करू इच्छीणार्‍या शेतकर्‍यांनी याला उपस्थित रहावे असे आवाहन कृषीमित्र स्व. हरीभाऊ जावळे मित्र परिवाराने केले आहे.

Exit mobile version