विद्यापीठतर्फे विविध स्पर्धांसाठी ४५ लाखाचे अनुदान जाहिर

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध स्पर्धा, कार्यक्रम, उपक्रम व कार्यशाळा आयोजनासाठी वित्तीय वर्ष २०२२-२३ अंतर्गत ७५ लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्याअंतर्गत विद्यापीठाकडून ४५ लाख रुपयांचे अनुदान जाहिर करण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने विविध प्रशाळा व महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते.  प्राप्त प्रस्ताव विद्यापीठाने नियुक्त केलेल्या आयोजन समिती समोर ठेवण्यात आले होते. त्यातून देशप्रेम, देशभक्ती पर गीत गायन, युवा संसद, स्वलिखित काव्य वाचन, पोवाडा गायन, पोस्टर सादरीकरण, निबंध लेखन, कथाकथन, घोष वाक्य, चित्रकला, सामान्य ज्ञान, मुशायरा, ग़ज़ल गायन व वक्तृत्व अशा विविध १५ स्पर्धांसाठी एकुण ११८ महाविद्यालयांच्या प्रस्तावापैकी समितीने ८३ प्रस्तावास मान्यता देऊन प्रत्येक महाविद्यालयास रु. १५ हजार याप्रमाणे एकुण  १२ लाख ४५ हजार रूपयांचे अर्थसहाय्य जाहिर केले आहे.

या व्यतिरिक्त नमन करो इस मिट्टी को, एक शाम देश के नाम या सार्वजनिक ठिकाणी आयोजित करावयाच्या उपक्रमासाठी १६ महाविद्यालयांना प्रत्येकी ५० हजार रूपये या प्रमाणे ८ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. अमृत महोत्सवी वर्षांमध्ये आपल्या जिल्ह्यातील व परिसरातील शहीद स्मारकांच्या ठिकाणी तिरंगा यात्रा, सायकल यात्रा व चित्ररथ काढण्यासाठी १२ महाविद्यालयांना प्रत्येकी १५ हजार रुपये, या प्रमाणे २ लाख २५ हजार रूपयांचा निधी जाहिर करण्यात आला आहे.

जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील व परिसरातील ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक विषयावर पुस्तक प्रकाशनासाठी रूपये २५ हजार रुपयांचे अनुदान विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास १३ महाविद्यालयांच्या प्रस्तावास विद्यापीठ समिती ने मान्यता देऊन पुस्तक प्रकाशनासाठी  ३ लाख २५ हजार रूपयांचे अर्थ सहाय्य जाहिर केले आहे. तसेच महाविद्यालयातील अधिकाधिक तरूणांना सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यासाठी २० महाविद्यालयांना प्रत्येकी १५ हजार रुपये या प्रमाणे एकुण ०३ लाख रूपयांचे अर्थ सहाय्य घोषित केले आहे.

तसेच या तीन्ही जिल्ह्यातील व परिसरातील स्वातंत्र्य सैनिकांचा व शहीद स्मारकांचा इतिहास माहितीपट, लघु चित्रपटाच्या माध्यमातून तरूण पीढी समोर यावा यासाठी ७ महाविद्यालयांना माहितीपट बनविण्यासाठी ३० हजार रुपये या प्रमाणे  २ लाख १० हजार रुपये व ५ महाविद्यालयांना लघु चित्रपट बनविण्यासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये या प्रमाणे  २ लाख ५० हजार रूपयांचे अर्थ सहाय्य जाहिर करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यासाठी रू.५ हजार या प्रमाणे ३० महाविद्यालयांना एकुण १ लाख ५० हजार रूपयांचे अनुदान घोषित करण्यात आले असून मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनासाठी रू.१० हजार या प्रमाणे २६ महाविद्यालयांना एकुण २ लाख ६० हजार रूपयांचे अर्थ सहाय्य अनुदान जाहिर करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्याच्या ठिकाणी व विद्यापीठ परिसरात “जालियनवाला बाग” या नाटकाचे नाट्य प्रयोग करण्यात येणार आहेत.

तसेच जे विद्यार्थी संशोधन क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन करत आहेत त्यांच्यासाठी “अमृत महोत्सवी संशोधन फेलोशिप” सुरू करण्यात आली असून या अंतर्गत निवड झालेल्या संशोधक विद्यार्थ्याला दोन वर्षे प्रति माह रू.१२ हजाराची फेलोशिप देण्याचा निर्णय झाला आहे. याबाबची जाहिरात विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा.सुनील कुलकर्णी यांनी दिली आहे.

 

Protected Content