Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अनोखे संशोधन : वाहनामुळे होणारे प्रदूषण कमी केल्याचा दावा

download 2

भोपाळ (वृत्तसंस्था) वाहनांमुळे होणाऱ्या हवा प्रदूषणावर नियंत्रण आणणारे एक उपकरण विकसित करण्यात आले आहे. भोपाळमधील लक्ष्मी नारायण तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी-शिक्षकांनी हे उपकरण विकसित केले आहे. या उपकरणामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण आणता येईल असा दावा करण्यात आला आहे.

 

वाहनांमुळे होणाऱ्या हवा प्रदूषणाचा मुद्दा अनेकदा गाजत असतो. हवा प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांकडे ही लक्ष वेधले जाते. हवा प्रदूषणातील घटकांमुळे अस्थमा, कॅन्सरसारखे आजार होण्याची शक्यता असते. वाहनांच्या प्रदूषणामुळे कार्बन डायऑक्साइड आणि इतर विषारी वायू हवेत मिसळले जातात. विद्यार्थ्यांनी ‘इलेक्ट्रोस्टॅटीक गॅस प्युरिफायर डीव्हाइस’ हे उपकरण बनवले आहे. या उपकरणामुळे वाहनांतून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या या उपकरणामुळे विषारी घटकांवरही नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक पुष्कल बदोनिया यांनी सांगितले, गेल्या वर्षभरापासून आमचे यावर संशोधन सुरू होते. यासंदर्भातील आमची दोन संशोधने आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहेत. तर, या उपकरणाची पेटंट नोंदणी केली असून लवकरच वाहनांमध्ये हे उपकरण बसवता येईल, अशी माहिती संशोधकांच्या टीममधील जॉसी जॉर्ज यांनी दिली. तन्मय शर्मा या विद्यार्थ्याने सांगितले की, या उपकरणाला अधिक चांगले करण्यासाठी उपकरणाच्या डिझाइनवर काम सुरू आहे. त्याशिवाय लवकरच हे उपकरण वाहनांवर लावण्यात येईल. त्यामुळे प्रदूषणावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येईल, अशी माहिती तन्मय शर्माने दिली. एक उपकरण बनवण्यासाठी तीन ते चार रुपयांचा खर्च आला. मात्र, मोठ्या प्रमाणावर याचे उत्पादन केल्यास हा खर्च १५०० ते २५०० इतका होऊ शकतो, असेही त्याने स्पष्ट केले.

Exit mobile version