Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा बुडून दुदैवी मृत्यू

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी येथील तरुणाचा विहिरीत पोहायला गेला असता बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ३० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पवन भिका जाधव (वय २३, रा. सुभाषवाडी ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पवन भिका जाधव हा परिवारासह राहत होता. मिस्त्री काम करून तो उदरनिर्वाह करीत होता. शनिवारी ३० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता तो मॉर्निंग वॉक करण्यासाठी बाहेर गेला होता. त्यावेळी तो गावातील एका विहिरीजवळ आला. तेथे तो पोहण्यासाठी विहिरीत उतरला असता, तेथे तो पोहताना बुडाला. दरम्यान, गावातील नागरिकांना घटना कळताच त्यांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलावले. त्यांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पवन जाधव याच्या पश्चात आई, वडील, २ भाऊ, २ विवाहित बहीण असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने सुभाषवाडी गावात शोककळा पसरली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Exit mobile version