Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘त्या’ काळात महिलांना समजून घ्या – वैशाली विसपुते

vaishali visapute

जळगाव प्रतिनिधी । मासिक पाळी आणि सॅनिटरी पॅडविषयी आजही ग्रामीण भागात फार अंधश्रद्धा आहे. महिला आणि मुलींचा आदर करा, मासिक पाळीच्या काळात त्यांना फार त्रास होत असून त्या दिवसांमध्ये त्यांच्या शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे त्यांना समजून घ्या, त्यांना आधार द्या, असा सल्ला निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी दिला. नेहरू युवा केंद्राच्या प्रशिक्षण शिबिरातील विद्यार्थ्यांनींशी त्या बोलत होत्या.

शहरातील नेहरू युवा केंद्रद्वारा आयोजित राष्ट्रीय युवा स्वयंसेवक अभिमुखीकरण प्रशिक्षण शिबिरातील विद्यार्थ्यांनी बुधवारी निधी फाऊंडेशनला भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. वैशाली विसपुते यांनी पुढे सांगितले की, मासिक पाळी विषयी अजूनही कुणीही बोलत नाही. तरुणच नव्हे तर तरुणी देखील मासिक पाळीविषयी बोलत नाही, हे आपले मोठे दुर्दैव आहे. मासिक पाळी हा शाप नसून वरदान आहे. महिला आणि मुली अजूनही सॅनिटरी पॅड खरेदी करण्यासाठी धीटपणे धजावत नाही. मासिक पाळीविषयी मोकळेपणाने बोलावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थींना केले.

‘ते’ पाच दिवसात परक्यासारखी वागणूक का?
पूर्वी महिलांना मासिक पाळी आल्यास त्यांना आराम मिळावा, म्हणून 5 दिवस विश्रांतीसाठी एका ठिकाणी बसण्याचा सल्ला दिला जात होता. परंतू काही समाजकंटकांनी त्याला वेगळे रूप दिले. मासिक पाळीच्या पाच दिवसात घरगुती काम करू न देणे, धार्मिक कार्यापासून लांब ठेवणे, कुणालाही स्पर्श न करणे अशी वागणूक दिली जाते. आज आपला समाज पुढारलेला आणि शिक्षित झालेला असताना महिलांसोबत वाळीत टाकल्यासारखा व्यवहार का? असा प्रश्न वैशाली विसपुते यांनी उपस्थित केला. महिला आणि मुलींना मासिक पाळीच्या काळात समजून घ्या, त्यांना आधार द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.

महिला स्वच्छतागृहांसाठी लढा
जळगाव शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह नव्हते, त्यामुळे महिलांची मोठी कुचंबना होत होती. एक महिला म्हणून आम्ही त्यासाठी आवाज उठवला. मनपा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी जळगावात 10 फायबर स्वच्छतागृह उभारण्यात आले. महिलांनी आपल्या हक्कांसाठी आवाज उठविणे गरजेचे असून आपल्या पुढाकारामुळे अनेकांना न्याय मिळू शकतो असे वैशाली विसपुते यांनी सांगितले.

निधी फाऊंडेशनच्या कार्याची माहिती
वैशाली विसपुते यांनी जळगावात सुरू केलेल्या निधी फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. मासिक पाळी, कापडमुक्त अभियान, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालयात लावण्यात येणारे सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशीन, सॅनिटरी नॅपकीन डिस्पोजल मशीन याचा उपयोग कसा होतो हे प्रत्यक्षात विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. औरंगाबाद, जालना आणि अहमदनगर येथील विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात देखील असे मशीन बसविण्याचा हेतू व्यक्त केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर नेहरू युवा केंद्र नांदेडच्या युवा समन्वयक चंदा रावळकर, सुनील पंजे, लेखापाल अजिंक्य गवळी, निधी फाऊंडेशनचे सुर्यकांत विसपुते विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version