Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विनाअनुदानित शिक्षकांतर्फे ‘शिक्षक दिन’ ‘काळा दिवस’ म्हणून साजरा (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 09 05 at 3.06.48 PM

जळगाव, प्रतिनिधी | शिक्षण विभागाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने आज, ५ सप्टेंबर शिक्षकदिनी काळा दिवस पाळण्यात आला.

कृती समितीने १३ ते २९ जुलै २०१५ दरम्यान मुंबई येथील आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते. कृती समितीने आपले आंदोलन मागे घ्यावे, याकरिता झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, अर्थमंत्री यांनी पात्र झालेल्या सर्व शाळांना त्वरित अनुदान देण्याचा निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते.  मात्र, एक महिन्याचा कालावधी उलटला तरी दिलेले आश्वासन न पाळल्याने आज शिक्षकदिनी ‘काळा दिवस’ पाळण्यात आला. तसेच शाळेत कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ नये असे आवाहन कृती समितीतर्फे करण्यात आल्याची माहिती नाशिक विभागीय अध्यक्ष अनिल परदेशी यांनी दिली. त्यामुळे जोपर्यंत शासन १९ सप्टेंबर २०१६ चा जी.आर रद्द करून प्रचलित नियमाने आनुदानाचे सूत्र लागू करणार नाही अंदोलन सुरुच राहणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. जळगाव जिल्ह्यामध्ये भडगाव, पाचोरा, पारोळा, चाळीसगाव, रावेर, संपूर्ण तालुक्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी विनावेतन काम करणारे शिक्षक आहेत त्या सर्व शाळांमधून आजचा दिवस ‘काळा शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. तर भडगाव येथून जवळच असलेल्या क.ता.ह.रा.पा.कि.शि.संस्था भडगाव,संचलीत गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालय कोळगाव (भडगाव) येथे शिक्षक दिन काळ्या फिती लावून साजरा करण्यात आला. तसेच गेल्या १६-१७ वर्षांपासून बिनपगारी सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना तात्काळ पगार सुरु करावा अशी मागणी शिक्षकांच्या शिष्ट मंडळाच्या वतीने करण्यात आली. तसेच विनाअनुदानित शिक्षकांच्या बाबतीत प्रचलीत नियमानुसार २०% अनुदानाचा घेतलेला निर्णय प्रत्यक्षात कागदावर आणून त्याचा शासन आदेश तात्काळ काढून शिक्षकांना न्याय द्यावा,अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.प्राचार्य आर.एस.पाटील,पर्यवेक्षक टी.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या कार्यक्रमास प्रा.आर. ए. पाटील, प्रा.किशोर चौधरी, प्रा.मनोज पवार तसेच नाशिक विभागीय सचिव प्रा.एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षकदिनी काळ्या फिती लाऊन कामकाज केले. तसेच शिक्षक दिन हा काळा दिवस म्हणून साजरा केला.

 

Exit mobile version