Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उज्ज्वल निकम यांच्यावर चरित्रपट येणार !

मुंबई । खान्देशचे थोर सुपुत्र तथा ज्येष्ठ विधीज्ज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची जीवनगाथा आता रूपेरी पडद्यावर येणार असून याबाबत आज अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे.

ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्यावरचा चरित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी आज याबाबतची घोषणा केली. अजमल कसाब सारख्या क्रूरकर्म्याला फासावर लटकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या या चरित्रपटाचे नाव ‘निकम’ असे असणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक भावेश मंडालिया आणि गौरव शुक्ला यांनी सिनेमाची पटकथा लिहिली आहे. येत्या नव्या वर्षात या सिनेमाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.

उज्ज्वल निकम यांनी दहशतवादी अजमल कसाब , कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरण,मोहसिन हत्या प्रकरण,प्रमोद महाजन हत्या प्रकरण हे खटले लढले आहेत.  आपल्या 30 वर्षाच्या करिअरमध्ये 628 आरोपींना जन्मठेप आणि 37 आरोपींना फाशीची शिक्षा मिळवून दिली आहे.   निकम यांना अंडरवर्ल्ड आणि दहशतवाद्यांकडून धमकी मिळालेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. अशी सुरक्षा मिळणारे निकम हे देशातील एकमेव वकील आहेत.   

 

 

 

Exit mobile version