Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उमेदवारी कापण्याबाबत पक्ष श्रेष्ठींकडे गार्‍हाणे मांडणार-उदय वाघ


जळगाव प्रतिनिधी । भाजपने ऐनवेळी आमदार स्मिता वाघ यांचे तिकिट कापले असून यामागे काही षडयंत्र असल्याचा संशय असून याबाबत आपण पक्षश्रेष्ठींकडे गार्‍हाणे मांडणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी व्यक्त केली आहे.

भाजपने आ. वाघ यांना जळगाव मतदार संघातून दिलेली उमेदवारी रद्द केल्याने नाराज झालेल्या समर्थकांची बैठक आज सकाळी त्यांच्या जळगाव येथील कार्यालयाजवळ झाली. त्यावेळी त्यांनी व त्यांचे पती उदय वाघ यांनी कार्यकर्ते व पत्रकारांशी बोलताना पक्षाच्या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. याप्रसंगी उदय वाघ म्हणाले की, आम्ही गेल्या ४० वर्षांपासून पक्षामध्ये काम करतोय, विद्यार्थी संघटनेपासून नंतर भाजपात सक्रीय आहे. जिल्ह्यात पक्ष वाढवण्यासाठी मी सातत्याने काम केले आहे. पक्षानेही कामाबद्दल नेहमी पावती दिली आहे, यावेळीही आधी संधी मिळाली होती पण नंतर तिकीट का कापले ? ते कळले नाही. त्याची कारणे जाणून घेण्यासाठी व काही षड्यंत्र आहे का ? याचा छडा लावण्यासाठी मी पक्ष श्रेष्ठींशी बोलणार आहे. मला सकाळपासून मुख्यमंत्री फडणवीस व जलसंपदामंत्री महाजन यांचे फोन आले आहेत. त्यांनी पक्षाच्या निर्णयाबद्दल चर्चा करून पक्षाच्या उमेदवारासाठी काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पक्षाचे जिल्हा संघटनमंत्री किशोर काळकर यांनी येवून भेट घेतली, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने आ.वाघ यांचे समर्थक उपस्थित होते.

दरम्यान, चार वर्षांपूर्वी पक्षात आलेल्याना उमेदवारी दिली गेली आहे पण आमच्य सारख्या निष्ठावंतांना मात्र हे फळ मिळाले आहे, अशा शब्दात आ. स्मिताताई वाघ यांनी आज आपली नाराजी जाहीर केली.

Exit mobile version