ब्रेकींग : ग. स. सोसायटीवर ‘सहकार’चा झेंडा ! उदय पाटील अध्यक्ष, रवींद्र सोनवणे उपाध्यक्ष

जळगाव, राहूल शिरसाळे | सरकारी नोकरांची सहकारी पतसंस्था म्हणजेच ग. स. सोसायटीवर सहकार गटाने लोकसहकारच्या दोन सदस्यांच्या मदतीने आपली सत्ता काबीज केली आहे. यात अध्यक्षपदी पॅनल प्रमुख उदय पाटील तर उपाध्यक्षपदी लोकसहकारचे फुटीर सदस्य रवींद्र सोनवणे यांची आज निवड जाहीर करण्यात आली.

ग. स. सोसायटीची यंदाची निवडणूक ही आरोप प्रत्यारोपांनी गाजली. यंदा बहुरंगी लढत झाल्यामुळे नेमकी सत्ता कुणाची येणार याबाबत संभ्रमावस्था होती. तर मतदारांनी देखील संमिश्र कौल दिल्यामुळे हा गोंधळ अजूनच वाढला. सहकार गटाने शेवटच्या टप्प्यात चांगलीच मुसंडी मारत नऊ जागा मिळविल्या असल्या तरी स्पष्ट बहुमत हुकल्याने त्यांना दुसर्‍या कुणासोबत तरी हातमिळवणी करणे गरजेचे होते. तर लोकसहकार आणि प्रगती शिक्षक सेना या दोन्ही पॅनलला देखील प्रत्येकी सहा जागा मिळाल्याने सत्ता स्थापनेचा तिढा वाढला होता. यात प्रगती शिक्षक सेना पॅनलने पहिल्यांदा आपल्याला अध्यक्षपद हवे ही मागणी लाऊन धरली. यात निवडीच्या दोन दिवस आधी लोकसहकारचे दोन सदस्य सहकारच्या गळाला लागल्याची चर्चा होती. आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी लोकसहकार आणि प्रगती शिक्षक सेनेच्या पॅनलने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. यात अध्यक्षपदी रावसाहेब पाटील तर उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड हे अर्ज भरणार असल्याची माहिती देखील देण्यात आली.

यानंतर सायंकाळी सहकार गटाचे नेते उदय पाटील एक फोटो सोशल मीडियात व्हायरल करत आपल्यासोबत अकरा ही मॅजिक फिगर असल्याचे जाहीर केल्याने आजची अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळाले होते. या अनुषंगाने आज दुपारी साडेबारा वाजेपासून सर्व संचालक क्रमाक्रमाने ग. स. सोसायटीमध्ये दाखल झाले. दुपारी एक वाजेपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली.

दरम्यान, साडेबारा वाजेच्या सुमारास दोन्ही पॅनलचे संचालक सोसायटीत निवड प्रक्रियेसाठी दाखल करत असतांनाच लोकसहकारचे दोन सदस्य हे सहकार पॅनलच्या संचालकांसोबत आल्याने एकच खळबळ उडाली. लोकसहकारच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत या दोघांना सभागृहात जाऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. यामुळे येथे प्रचंड गोंधळ उडाला. बराच वेळ संचालकांना मध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. अखेर प्रचंड पोलीस बंदोबस्तात एक वाजता सहकार गटाचे सर्व संचालक लोकसहकारच्या दोन सदस्यांसह सभागृहात दाखल झाले. सभागृहात जाण्याआधी मनोज पाटील म्हणाले की, आमच्या दोन गटाला आमीष देऊन रात्री त्यांना पळवून नेले. यात रवींद्र सोनवणे (भडगाव) आणि ज्ञानेश्‍वर सोनवणे (जळगाव) हे दोन सदस्य फुटल्याची माहिती त्यांनी दिली. विरोधी सहकार गटाने आमीष दाखवून आमच्या संचालकांना फोडल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र सभागृहात कोणत्याही क्षणाला काहीही होऊ शकते असे देखील त्यांनी नमूद केले.

दरम्यान, यानंतर सोसायटीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली. यात लोकसहकार आणि प्रगती शिक्षक पॅनलतर्फे अनुक्रमे रावसाहेब पाटील आणि अनिल गायकवाड यांनी अर्ज दाखल केले. तर सहकार पॅनलतर्फे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी अनुक्रमे पॅनल प्रमुख उदय पाटील आणि लोकसहकारचे फुटीर सदस्य रवींद्र सोनवणे यांनी अर्ज दाखल केले. यात अध्यक्ष व उपाध्यक्षपदी सहकारच्याच उमेदवारांना विजयश्री प्राप्त झाली. सहकारच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ११ तर लोकसहकार व प्रगती शिक्षक सेनेच्या संयुक्त उमेदवारांना प्रत्येकी १० मते पडली. अर्थात, एका मताचा फरकाने सहकार पॅनलने सत्ता काबीज करण्याची कामगिरी बजावली आहे.

Protected Content