Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमेरिकी गुप्तहेरांनी चीनचा आगाऊपणा उघड पाडला

 

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था । लडाखमध्ये पॅन्गाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळील भागात चीनच्या घुसखोरीचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला. आपल्या कुरापती जगासमोर येऊ नये यासाठी चीनने भारताविरोधातच आवई उठवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, भारताविरोधात चीननेच आगळीक केली असल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतीय जवानांनी आपल्या ताब्यातील भूभाग गमावला नसल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

अमेरिकेतील गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार, चीनकडून दगाफटका होण्याचा अंदाज भारतीय जवानांना होता. . त्यासाठी गस्तही वाढवण्यात आली. पॅन्गाँगमधील संघर्षात नेमकी सुरुवात कोणी केली याबाबत स्पष्टता नाही. मात्र, चीनने याआधी केलेल्या आगळकीच्या आधारे अमेरिकेने भारताची बाजू घेतली आहे. चीनने अचानक आक्रमक पाऊल का उचलले याबाबत अमेरिकेचे गुप्तचर अधिकारी कोड्यात पडले आहे.

चीन वादग्रस्त भागात कॅम्प बनवत होता. त्यावेळी भारतीय सैन्य त्या ठिकाणी आले व वाद झाला. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये तणाव वाढण्याआधी दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेतली. बीजिंगमधील वरिष्ठ लष्करी कमांडच्या मताच्या विरुद्ध निर्णय घेत कमांडरने मागे हटण्याचा निर्णय घेतला. कमांडरने घेतलेल्या निर्णयाचा चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.

भारताच्या आक्रमकतेनंतर चीनची नाचक्की झाली आहे. आता चीनकडून ‘मिशन डॅमेज कंट्रोल’ सुरू करण्यात आले आहे. २४ तासांमध्ये चीनकडून पाच वक्तव्ये जारी करण्यात आली आहेत. यामध्ये दोन वक्तव्ये चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून, एक वक्तव्य चिनी लष्कराकडून, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक आणि भारतातील चिनी दूतावासाकडून एक वक्तव्य जारी करण्यात आले आहे.

दरम्यान, भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या महिन्यात Quad बैठकीसाठी एकत्र येणार आहेत. गुप्त माहितीच्या आदान-प्रदानाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताला मोठा फायदा होणार आहे.

Exit mobile version