‘उज्वल भारत, उज्वल भविष्य’ अंतर्गत ऊर्जा मंत्रालयाचे दोन कार्यक्रम

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | देशाच्या अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून केंद्रीय नवी आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि महावितरणच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यात ‘उज्वल भारत, उज्वल भविष्य’ अंतर्गत दोन कार्यक्रम आयोजित करणार असल्याची माहिती बुलढाणा मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता संजय आकोडे यांनी दिली आहे.

यातील पहिला कार्यक्रम बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात मंगळवार, दि.२६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.  कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून खासदार प्रतापराव जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

दुसरा कार्यक्रम लोणार येथील तहसील कार्यालयात गुरुवार, दि. २८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मागील वर्षाच्या कालावधीत राबवलेल्या विविध योजनांचे सादरीकरण होऊन योजनेतील लाभार्त्या सोबत लोक प्रतिनिधी आणि अधिकारी संवाद साधणार आहेत. मागील ८ वर्षाच्या कालावधीत महावितरणकडून राज्यात उच्च दाब वीज वितरण प्रणाली मार्फत शेतकऱ्यांना वीज पुरवठा, दुर्गम आणि ग्रामीण भागातील गावकऱ्यांना सौभाग्य योजनेमार्फत वीज पुरवठा, सौर कृषी पंपाद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा, महावितरणचे नवीन कृषी धोरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना,  विलासराव देशमुख अभय योजना आदी वीज ग्राहक आणि शेतकरी बांधवासाठी व्यतिगत योजना या काळात राबविण्यात आल्या. या दोन्ही कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन बुलढाण्याचे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री सातपुते यांनी केले आहे.

Protected Content