Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सत्कार कार्यक्रमात दोन जणांना मारहाण करून जबरी रोकड लांबविली

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे  बसस्थानक चौकात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमात अज्ञात पाच जणांनी गावातील २ जणांना मारहाण करून त्यांच्या जवळून एकूण ८१ हजार ५०० रुपयांची रोकड जबरी हिसकावून चोरी केल्याची घटना सोमवारी उघडकीला आली आहे. या संदर्भात मंगळवारी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक असे की, भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे गावात  सोमवारी ४ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये स्थानिक रहिवाशी राजीव रूपचंद चौधरी (वय-५३) हे देखील आले होते. त्यांच्यासोबत इतर काही गावातील मंडळ देखील उपस्थित होते. दरम्यान या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमांमध्ये अज्ञात ५ जणांनी राजू चौधरी आणि त्यांच्यासोबत असलेल्या एकाला मारहाण करून धमकी देत त्यांच्या खिशातील ८१ हजार ५०० रूपयांची रोकड जबरी काढून चोरून नेली. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर राजू चौधरी यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार मंगळवारी ५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे करीत आहे.

Exit mobile version