Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घरफोडी करणारी टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळल्या; रामानंदनगर पोलीसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरासह बुलढाणा जिल्ह्यासह मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यात अशा विविध ठिकाणी बंद घर फोडून चोरी करणाऱ्या टोळीतील दोन जणांना सोमवारी २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलीसांनी पिंप्राळा हुडको परिसरातून अटक केली आहे. टोळीतील एक साथिदार हा फरार झाला आहे. दोघांकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. जियाऊल्ला खान असदऊल्ला खान वय ६० रा. नांदुरा जि.बुलढाणा आणि सैय्यद अफसर सय्यद अजगर वय २२ रा. पिंप्राळा हुडको जळगाव असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहे.

जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील घरफोडी आणि ऑडीटर कॉलनीतील घरफोडी केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही घरफोडी करणारी टोळी ही सैय्यद अफसर याच्या पिंप्राळा हुडको येथील घरात राहत असल्याची गोपनिय माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ सुशिल चौधरी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांना दिली. त्यानुसार पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. दरम्यान, सोमवारी २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पोहेकॉ संजय सपकाळे, सुशिल चौधरी, जितेंद्र राजपूत यांनी कारवाई करत संशयित आरोपी जियाऊल्ला खान असदऊल्ला खान वय ६० रा. नांदुरा जि.बुलढाणा आणि सैय्यद अफसर सय्यद अजगर वय २२ रा. पिंप्राळा हुडको जळगाव यांना अटक केली. त्याच्या एक साथिदार हा फरार झाला आहे. त्यांनी घरफोडी करण्याकरीत वापरलेली रिक्षा देखील जप्त केली आहे. त्यांनी दोन्ही घरफोडीसह बुलढाणा जिल्ह्यात आणि मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यात केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राजपूत हे करीत आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि विठ्ठल पाटील, तसेच पोहेकॉ जितेंद्र राजपूत, पोहेकॉ संजय सपकाळे, सुशिल चौधरी, पोहेकॉ इरफान मलिक, पो.ना. हेमंत कळसकर, पो.ना. विनोद सुर्यवंशी, पो.कॉ. उमेश पवार, पोकॉ जुलालसिंग परदेशी आदींनी ही कारवाई केली आहे.

Exit mobile version